६ हजारात शर्ट, पॅन्ट, टूथपेस्ट, जोडे घ्या, त्यामुळे या वस्तूंचे उत्पादन वाढेल!- राहुल गांधी
   दिनांक :27-Apr-2019
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ओरिसातील शेवटची सभा बालासोर येथे घेतली. या सभेत ते म्हणाले, आम्ही दर महिन्याला गरीबांना 6 हजार रुपये देऊ. त्यातून रोजगार निर्माण होतील. कसे?
त्याचे तर्कशास्त्र समजावून सांगताना राहुल गांधी म्हणाले, ज्यावेळी तुमच्याजवळ पैसे येतील, तेव्हा तुम्ही त्या पैशातून शर्ट, पॅन्ट, टूथपेस्ट, जोडे खरेदी कराल. त्यामुळे दुकानदारांचा खप वाढेल. कारखाने या मालाचे अधिक उत्पादन करतील. त्यासाठी ते मोठ्या संख्येने कामगार ठेवतील. यामुळे रोजगाराचा प्रश्न कायमचा संपून जाईल. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन आणि अन्य अर्थशास्त्रज्ञांनी न्याय योजनेमुळे काय फायदा होईल, बेकारी कशी दूर होईल, उत्पादन कसे वाढेल, अर्थव्यवस्थेला कशी बळकटी येईल हे सूत्र त्यांनीच आम्हाला पटवून दिल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्यांच्याच सल्ल्यानुसार आम्ही ही योजना आणली असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

 
 
 
आमच्या न्याय योजनेचे दोन प्रमुख उद्देश आहेत. एक तर गरिबांना मदत होईल आणि दुसरे म्हणजे भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल! मी न्याय योजना तयार करताना, अनेक अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक क्षेत्रातील जाणकारांशी बोललो आहे. त्यांनी न्याय योजना राबविल्यास काय फायदे होऊ शकतात, याचे गणित मला समजावून सांगितले आहे. त्या आधारावर मी हे बोलत आहे. मोदींनी देशाची अर्थव्यवस्था तर पार बिघडवून टाकली आहे. आम्ही सत्तेवर आलो तर कर्जमाफी असलेल्या शेतकर्‍याला तुरुंगात टाकणार नाही. आम्ही या कर्जमाफीच्या केसेस दिवाणी न्यायालयात दाखल करू. या दोन्ही बाबींवर राहुल गांधींना समाजमाध्यमांनी खूप ट्रोल केले. म्हणजे महिन्याला 6 हजार रुपये त्यांना कपडे, जोडे, टूथपेस्ट घेण्यासाठी राहुल गांधी देणार आहेत. राहुल म्हणतात, शेतकर्‍यांना जेलमध्ये टाकणार नाही. मग दिवाणी कोर्टाने त्यांच्या जमिनी जप्त करून त्यांना देशोधडीला लावण्याचा राहुल गांधींचा विचार दिसतो.
राहुल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे 6 हजारात कपडे, टूथपेस्ट, शर्ट, पूॅन्ट, जोडे घ्या आणि ते उत्पादन करणार्‍यांचे उत्पादन वाढवा, या अजब तर्कावर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.