नोटबंदीमुळे राज ठाकरेंचे दुकान बंद- मुख्यमंत्री

    दिनांक :27-Apr-2019
नाशिक: नोटबंदीच्या निर्णयावर सातत्याने टीका करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी येथे जोरदार हल्ला चढविला. काळा पैसा बाहेर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा धाडसी निर्णय घेतला आणि यामुळे अमाप काळा पैसा जमा करणार्‍या इतर नेत्यांप्रमाणेच राज ठाकरे यांचेही दुकान बंद झाले, असा चिमटा मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढला.
नाशिक येथे आयोजित भव्य जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच कॉंगे्रस आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसवरही आसूड ओढले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मनसेचे इंजीन भाड्याने घेतले आहे; पण शरद पवार यांना हे माहीत नाही की, तोंडाच्या वाफेने इंजीन चालू शकत नाही. तोंडाच्या वाफेने हे इंजीन चालले असते, तर ते आतापर्यंत दिल्लीला पोहोचले असते. हे इंजीन गल्लीतच राहिले, कारण नोटबंदीमुळे राज ठाकरेंचे दुकान बंद झाले आहे आणि म्हणून त्यांचा जळफळाट होत आहे. राष्ट्रवादीचीही आता अशीच अवस्था होणार आहे, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
 

 
 
या सभेत मुख्यमंत्र्यांच्या टीकेचा रोख थेट राज ठाकरेंवर होता, शिवाय शरद पवार, छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी जोरदार प्रहार केले. भुजबळांनी भ्रष्टाचार केला, तिजोर्‍या लुटल्या म्हणून त्यांना तुरुंगात टाकावे लागले. त्यांच्यावर लवकरच खटला सुरू होणार आहे. न्यायदेवताच त्यांच्या पापांचा निर्णय घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या बालाकोट येथे घुसून आपल्या हवाई दलाने केलेल्या कारवाईवर राज ठाकरे यांनी केलेली टीका म्हणजे सशस्त्र दलांच्या शौर्यावर संशय घेण्यासारखे आहे, असा आरोप त्यांनी केला. देशद्रोह्यांना अद्दल घडविणारे 124 अ रद्द करण्याची भाषा कॉंग्रेस करीत आहे, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.