धक्कादायक! उष्माघाताने नागपुरात चौघांचा मृत्यू
   दिनांक :27-Apr-2019
नागपूर: दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने लोक त्रस्त झाले असून त्यातच उष्माघातामुळे शहरातील विविध भागात चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मागील आठ दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. लोकांना घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. लोक कामानिमित्तच घराबाहेर पडतात. दुपारनंतर रस्ते देखील सुनसान होत आहे. त्यातच फुटपाथवर राहणाऱ्या लोकांची अवस्था तर फारच बिकट आहे. शहरात उष्माघातामुळे नंदनवन हद्दीत दोघांचा मृत्यू झाला. दिघोरी उड्डाणपुलाजवळील आदिवासी ले आऊट येथे राहणाऱ्या  ज्ञानेश्वर बाजीराव पेंदाम (६०) हा वृद्ध शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास उड्डाणपुलाखाली मृतावस्थेत आढळला. त्याचप्रमाणे सकाळी १०.३० च्या सुमारास संघर्षनगर चौकातील बोबडे यांच्या रिकाम्या प्लॉटवर एक ५० ते ५५ वयोगटातील इसम मृतावस्थेत आढळला.
 
 
 
 
लकडगंज हद्दीत इतवारी रेल्वेस्थानकाच्या रेल्वे क्वॉर्टरजवळील फुटपाथवर शनिवारी दुपारी २ च्या सुमारास ३५ ते ४० वयोगटातील एक इसम बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर उपचारासाठी त्याला मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचप्रमाणे कळमना हद्दीत शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास भय्या नावाचा इसम हा भारतनगर रोडवर एका ट्रकच्या डाल्यामध्ये मृतावस्थेत मिळाला. याप्रकरणी नंदनवन, लकडगंज आणि कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
वाढत्या उन्हामुळे लोकांना काळजी घेणे गरजेचे झाले आहे.