आंतरजातीय विवाह केल्याने मुलीची निर्घृण हत्या

    दिनांक :27-Apr-2019
 
 
नगर: आंतरजातीय विवाह केल्याने आईवडिलांनी मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जाळून टाकल्याची घटना नेवाशातील कौठा गावात घडली. प्रतिभा कोठावले असे मृतकाचे नाव असून, पती देवेंद्र कोठावले यांनी मुलीचे आईवडील ब्रह्मदेव रमाजी मरकड व आशा मरकड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
 

 
 
पोलिस सूत्रानुसार, प्रतिभा आणि देवेंद्र यांनी 1 एप्रिल रोजी लग्न केले होते. देवेंद्र कोठावले वैद्यकीय प्रतिनिधी असून, प्रतिभा औषधी दुकानात नोकरी करत होती. वारंवार भेटीमुळे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, आंतरजातीय विवाहाला मरकड परिवाराचा विरोध असल्याने दोघांनी संगमनेरमधील एका मंदिरात विवाह केला. यानंतर 24 एप्रिल रोजी प्रतिभाच्या आई वडिलांनी तिच्याशी संपर्क करून देवेंद्रसोबत पुन्हा लग्न करून देऊ, अशी भूल देत गावाकडे बोलवून घेतले आणि तिची हत्या केली. प्रतिभाच्या मोबाईलवर संपर्क होत नसल्याने त्याने मित्रासह सासर गाठले. ब्रम्हदेव मरकड यांनी प्रतिभाचा हार्ट अटकने मृत्यू झाला असून, घरीच अंत्यविधी केला, असे सांगितले. यावेळी जबरदस्त धक्का बसलेल्या देवेंद्र यांनी आपल्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप केला असता, ब्रह्मदेव मरकडने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर देवेंद्र यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.