सनी देओल केवळ फिल्मी सैनिक, मी खरा सैनिक : अमरिंदरिंसग
   दिनांक :27-Apr-2019
चित्रपट अभिनेता सनी देओल यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आणि पक्षाने त्यांना पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून उमेदवारीही दिली आहे.
यावरून पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरिंसग यांनी सनी देओलवर टिप्पणी केली आहे. ते म्हणतात, सनी देओल तर केवळ चित्रपटातील फौजी आहे. खरा फौजी तर मी आहे.
गुरुदासपूरमधून कॉंग्रेसने सुनील जाखड यांना मैदानात उतरविले आहे. त्यांच्या विरोधात भाजपाने सनी देओल यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे आता ही जागाही प्रमुख लढतींच्या यादीत आली आहे.
 
 
 
 
अमरिंदरिंसग म्हणाले, आम्हाला गुरुदासपूरमध्ये सनी देओलपासून कोणताही धोका नाही. सुनील जाखड येथून जिंकणार आहेत.
सनी देओल यांनी म्हटले आहे की, माझे वडील धर्मेंद्र हे अटलजींच्या काळात भाजपाचे खासदार होते. आज मी मोदीजींशी जुळलो आहे. माझ्याकडून जे काही करणे शक्य आहे, ते मी सर्व भाजपा परिवारासाठी करेन. केवळ मोदीच या देशाला पुढे नेऊ शकतात आणि शत्रूंशी समर्थपणे मुकाबला करू शकतात. कॉंग्रेसने इतक्या वर्षात काय केले, हे आपण बघतच आहोत. मी केवळ बोलणार नाही तर मी ते आपल्या कामातून दाखवून देणार आहे.
अमरिंदरिंसग यांचे म्हणणे आहे की, सनी देओल या बाहेरच्या व्यक्तीला भाजपाने उमेदवारी दिली आहे.ज्यांनी पक्षासाठी इतकी वर्षे परिश्रम केले, त्यांना मात्र डावलण्यात आले आहे. भाजपाने याचे उत्तर देताना म्हटले आहे की, सर्वांना विश्वासात घेऊनच सनी देओल यांना उमेदवारी दिली आहे.
एक मात्र खरे की, कॉंग्रेस गोटात सनी देओलच्या गुरुदासपूरमधील उमेदवारीने चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेसला याची धास्ती आहे की, भाजपा सनी देओलला लगतच्या मतदारसंघातही प्रचारासाठी घेऊन जाणार आहेत. त्यामुळे त्या मतदारसंघांवरही परिणाम होणार आहे.