दहशतवादी हल्ल्यांमुळे पाकमध्ये पोलियो निर्मूलन मोहीम स्थगित
   दिनांक :27-Apr-2019
- देशाच्या इतिहासातील पहिलीच वेळ!
- महिला कर्मचार्‍यासह दोन ठार
इस्लामाबाद,
पाकिस्तान सरकारने पोलियोप्रतिबंधक मोहीम आणि मोहिमेनंतरचा आढावा स्थगित केला आहे. या मोहिमेत सहभागी कार्यकर्ते आणि कर्मचारी यांच्यावर वारंवार होणार्‍या दहशवादी हल्ल्यांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील विविध ठिकाणी पाकिस्तानात हे हल्ले होत आहेत. मोहिमेनंतरचा आढावा स्थगित करण्याची पाकिस्तानच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे, हे येथे उल्लेखनीय. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेप्रमाणे, हा आढावा घेण्यात येणार होता.
 
 
 
पाच वर्षांखालील बालकांना पोलियो डोज पाजण्याची देशव्यापी मोहीम पाकिस्तानात सोमवारी प्रारंभ करण्यात आली. या मोहिमेत देशभरातील तीन कोटी 90 लाख बालकांना पोलियो डोज पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. शुक्रवार हा या मोहिमेचा अखेरचा दिवस होता. त्यानंतर, या मोहिमेचा आढावा घेण्यात येणार होता. पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात पोलियो निर्मूलन कर्मचार्‍यांना घेऊन जाणार्‍या ताफ्यातील सुरक्षा रक्षक ठार झाल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. तर, बलुचिस्तान प्रांतात एका महिला कर्मचार्‍याला हल्लेखोरांनी ठार केले.
 
पाकिस्तानमध्ये पोलियो निर्मूलनासाठीच्या लसीकरणाचा दर हा नेहमीच कमीच राहिला आणि यामध्ये अनेक घटकांनी अडथळेही निर्माण केले. या अडथळ्यांपैकी सर्वाधिक आणि मुख्य अडचण दहशतवादी गटांची आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनवा आणि बलुचिस्तानच्या दुर्गम आणि धोकादायक भागांमध्ये पोलियो लसीकरणासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना घेऊन जाणे व लसीकरणाचे काम पूर्ण करणे हे बिकट कार्य आहे. या गटांतर्फे पोलियो निर्मूलन मोहिमेत वारंवार अडथळे आणले जातात. पोलियो लसीकरणासाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांच्या ताफ्यांवर हल्ले होत असतात. त्यामुळे पाकिस्तानची आरोग्यसेवा प्रणाली नेहमीच कोलमडते.
 
दरम्यान, पाकिस्तानमधील पोलियो डोज पाजण्याच्या मोहिमेमध्ये काही बालकांना लस पाजण्यात आल्यानंतर ते आजारी पडल्याने त्यांना तत्काळ पेशावर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर समाजमाध्यमांवर विविध अफवांना ऊत आला. परिणामी, प्रशासनाने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.