मोदींच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तबच!
   दिनांक :27-Apr-2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, शुक्रवारी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरला. त्यापूर्वी गुरुवारी त्यांनी वाराणसीत सात किलोमीटर लांबीचा रोड शो करून, भारतीय जनता पार्टीची ताकद किती आहे आणि पंतप्रधान म्हणून त्यांची स्वत:ची लोकप्रियता किती आहे, हे दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीत, गुजरातमधील बडोदा येथूनही अर्ज भरला होता आणि नंतर तिथून राजीनामाही दिला होता. यावेळी त्यांनी फक्त वाराणसीमधूनच अर्ज भरला आहे. गेल्या पाच वर्षांत वाराणसी मतदारसंघात त्यांनी विकासाची जी कामं केली आहेत, ती कामंच यंदा मोदींना प्रचंड बहुमताने विजयी करणार, या शंका नाही. गेल्या वेळी मोदी यांनी ज्यांना पराभूत केले होते, तेच अजय राय यावेळी पुन्हा कॉंग्रेसकडून मोदींविरोधात मैदानात आहेत. सपा आणि बसपाच्या आघाडीचा उमेदवारही मैदानात आहे. असे असले तरी गुरुवारचा रोड शो आणि शुक्रवारचा नामांकन अर्ज या दोन प्रसंगांनी मोदींच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. वाराणसीत लोकसभेची निवडणूक एकतर्फी होईल आणि मोदी प्रचंड मताधिक्क्याने जिंकतील, असा जो अंदाज व्यक्त केला जात आहे, तो खरा ठरणार, यात शंका नाही.

तसे पाहिले तर मोदींना शक्तिप्रदर्शन करण्याची आवश्यकताच नाही. त्यांनी स्वत:हून शक्तिप्रदर्शन केलेही नाही. देशाचा पंतप्रधान आपल्या शहरात, आपल्या मतदारसंघात येणार, रोड शो करणार, आपल्याला भेटणार, याची वाराणसीतील लोकांना प्रचंड उत्सुकता होती. गुरुवारी जेव्हा रोड शो झाला, त्या वेळी भर उन्हातही वाराणसीतील लोक मोदींच्या स्वागतासाठी रस्त्यारस्त्यावर ठिकठिकाणी उभे होते. नुसतेच उभे होते असे नव्हे, तर प्रत्येक घराच्या छतावरून मोदींवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता. हे कशाचे परिचायक आहे? अर्थातच, मोदींच्या लोकप्रियतेचे! पंतप्रधानपदासाठी आजही देशात मोदींच्याच नावाला सर्वाधिक पसंती आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे नंबर दोनवर असले, तरी मोदी आणि राहुल गांधी यांना असलेल्या पसंतीच्या टक्केवारीत बरेच अंतर आहे. मोदींची लोकप्रियता राहुल गांधींच्या दुप्पट आहे. मोदींच्या सभांना होणारी गर्दीही त्याचा पुरावा आहे. वाराणसीत दोन दिवस जी दृश्ये आम्ही पाहिलीत, त्यावरून तर मोदींचा पंतप्रधानपदाचा रथ कुणीही रोखू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे.
विरोधी पक्षातील लोक आणि स्वयंघोषित राजकीय पंडित काहीही सांगत असले, तरी 2019 च्या निवडणुकीनंतर देशात पुन्हा मोदींच्याच नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येणार, हे स्पष्ट झाले आहे. उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्यात आघाडी झाली असली, तरी त्याचा मोठा फटका भाजपाला बसेल, अशी स्थिती नाही. फटका बसणार हे निश्चित. पण, तो फार मोठा नसेल. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. गेल्या वेळी भाजपाला 73 मिळाल्या होत्या. यावेळी त्यात घट होऊन त्या 30-35 वर येतील, असा जो राजकीय पंडितांचा अंदाज आहे, तो खोटा ठरेल आणि भाजपाला किमान 54 जागा तरी मिळतील, असे राजकीय चित्र आज दिसत आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत यात बदल होऊन भाजपाच्या जागांमध्ये कदाचित वाढही होऊ शकते. देशाला स्थिर सरकार देण्याची क्षमता फक्त भाजपा आणि मोदींमध्येच आहे, हे जनतेने ओळखले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही तीन राज्ये भाजपाच्या हातून गेली असली, तरी या राज्यांमध्ये विधानसभेपेक्षा वेगळे निकाल लोकसभेच्या निवडणुकीत लागतील आणि भाजपाच्या जागांमध्ये फार घट होणार नाही, यातही शंका नाही. या तीन राज्यांमध्ये एकूण 65 जागा आहेत आणि गेल्या वेळी भाजपाने 61 जागा जिंकल्या होत्या. यावेळी ही तीन राज्ये जरी कॉंग्रेसकडे असली, तरी या तीन राज्यांमध्ये 65 पैकी किमान 53 जागा भाजपाला मिळतील, असा अंदाज आहे. इथे ज्या आठ जागा कमी होऊ शकतात, त्या ओरिसातून भरून निघतील. ओरिसात भाजपाला किमान 14 जागा जिंकता येतील, अशी राजकीय परिस्थिती भाजपाने प्रयत्नपूर्वक निर्माण केली आहे. फार आधीपासून भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी नियोजन केले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ओरिसात अनेक प्रचार सभा घेत भाजपाचा जनाधार बळकट केला होता. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये होणारे आठ जागांचे नुकसान भरून काढल्यावरही ओरिसातील सहा जागा शिल्लक राहतील, त्या उत्तरप्रदेशातले नुकसान काही प्रमाणात भरून काढतील. त्याचप्रमाणे भाजपाने गेल्या दोन वर्षांपासून ममतादीदींच्या गडाला म्हणजे पश्चिम बंगालला धडक दिली आहे. बंगालमध्ये भाजपाने आपली पाळेमुळे रुजवण्यात यश मिळवले असून, तिथे किमान 20 जागा भाजपाला मिळतील, असा अंदाज आहे. या 20 जागाही उत्तरप्रदेशचे नुकसान भरून काढतील. त्यामुळे कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्ष जर उत्तरप्रदेशात भाजपाच्या जागा कमी होण्याच्या अंदाजाने हुरळून गेले असतील, तर त्यांनी लवकर जमिनीवर आलेले बरे. अन्यथा, 23 मे रोजी त्यांना जो धक्का बसेल, त्यातून सावरायला त्यांना 2024 ची वाट बघावी लागेल!
केरळात भाजपाला गेल्या वेळी एकही जागा मिळाली नव्हती. पण, यावेळी किमान दोन जागा िंजकता येतील, असे राजकीय चित्र आहे. बिहारमध्ये भाजपाची जेडीयूशी युती आहे. त्यामुळे तिथेही भाजपाला चांगले यश मिळेल. किमान 14 जागा भाजपाला मिळण्याची आशा आहे. गेल्या वेळी भाजपाला 22 जागा मिळाल्या होत्या. कारण, भाजपाने तिथल्या बहुतांश जागा लढल्या होत्या. पण, यावेळी नितीशकुमारांच्या जेडीयूशी युती झाल्याने भाजपाच्या वाट्याला कमी जागा आल्या आहेत. तरीही जे यश मिळणार आहे, ते लक्षणीय असेल, असे मानले जात आहे. झारखंडमध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत आणि गेल्या वेळी भाजपाला 12 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यात एकदोन जागांची घट होण्याची शक्यता असली, तरी फार नुकसान सहन करावे लागेल, अशी स्थिती नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामगिरीचा हा परिणाम असणार आहे. विधानसभांच्या निवडणुकांमध्ये जे निकाल लागले, त्यापेक्षा वेगळे निकाल लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार, हे निश्चित!
ईशान्य भारतात भाजपाला वाईटात वाईट परिस्थितीत किमान 11 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. यंदा पंजाबमध्येही भाजपाला चार जागा निश्चितपणे मिळतील आणि कर्नाटकातही 15पेक्षा जास्त जागा मिळून भाजपाचे संख्याबळ हे वरच्या दिशेने जाईल, असा एक अंदाज आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाला दोन जागा जिंकता येतील आणि गोव्यातील दोन्ही जागाही भाजपाच्याच खात्यात येतील. त्यामुळे भाजपाची बहुमताकडची वाटचाल सुरू राहील. दिल्लीत आम आदमी पार्टी आणि कॉंग्रेस यांच्यात युती न झाल्याने यंदा पुन्हा सातही जागा जिंकण्याची सुवर्णसंधी भाजपाला चालून आलेली आहे. गुजरातमध्ये गेल्या वेळी भाजपाने 25 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यात तीन-चार जागांची घट होईल आणि 21 जागा भाजपाला मिळतील, असाही एक अंदाज आहे. आकडेवारी लक्षात घेतली तर पडझड फार नाही, हे स्पष्ट होते. पंतप्रधान मोदी यांनी पाच वर्षांत ज्या लोकोपयोगी योजना प्रभावीपणे राबविल्या, जगात भारताची प्रतिष्ठा वाढविली, त्याचा हा परिणाम असेल, हे कुणी नाकारू शकणार नाही!