राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याचा राहुल गांधींचा सल्ला धक्कादायक होता – विखे पाटील
   दिनांक :27-Apr-2019
लोणी येथे शनिवारी पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक खळबळजनक खुलासा केला. नगरच्या जागेसंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर या जागेसाठी मी प्रयत्न करेन असं राहुल गांधी म्हणतील असं वाटलं होतं. मात्र, त्यांनी सुजय विखेंना काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्याचा धक्कादायक सल्ला दिला, असा खळबळजनक खुलासा त्यांनी यावेळी केला. विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा राहुल गांधींनी स्विकारल्यानंतर आता हा खुलासा करण्याची योग्य वेळ असल्याचे सांगत त्यांनी मनातली खदखद बोलून दाखवली. साडेचार वर्षे विरोधीपक्ष नेतेपद सांभाळण्याचं फलीत काय तर काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीकडून लढण्याचा सल्ला मिळणं दुर्देवी होतं, असंही ते यावेळी म्हणाले.
 
 
विखे म्हणाले, नगरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार सलग तीनदा पराभूत झाला होता, म्हणून ही जागा काँग्रेसला सोडावी अशी आमची मागणी होती. निवडून येण्याची क्षमता असल्याने डॉ. सुजय विखेंना उमेदवारी द्यावी असा आमचा आग्रह होता. यासाठी मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करीत असतानाच राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी त्याचवेळी पत्रकार परिषद घेतली आणि आमचे वडील बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. पवारांकडून आमच्या वडिलांबाबत केले गेलेले वक्तव्य मनाला वेदना देणारं होतं. पवारांच्या या पत्रकार परिषदेनंतर डॉ. सुजय विखेंनी तडकाफडकी भाजपात जाण्याची घोषणा केली. दरम्यान, मुलानेच भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने आपण विरोधीपक्ष नेतेपदावर रहायचे नाही असं मी ठरवंल होतं. त्याचबरोबर आमच्या वडिलांचा अपमान झाल्याने मी राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही असंही जाहीर केलं होतं.