पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना पाठिंबा नाही- शरद पवार

    दिनांक :27-Apr-2019
तभा ऑनलाईन टीम  
मुंबई,
पंतप्रधानपदासाठी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावावर सुरू असलेली चर्चा उगाचच असल्याचे स्पष्ट करताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानपदी राहुल गांधी मुळीच मान्य नसल्याचे संकेत दिले आहेत. भाजपाप्रणीत रालोआला बहुमत न मिळाल्यास आणि अन्य प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत दिसल्यास, रालोआविरोधी दलांमधीलच एक सर्वमान्य नेता पंतप्रधानपदाचा दावेदार असणार असल्याचे शरद पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. 
 
 
 
 
तृणमूल कॉग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसपा प्रमुख मायावती आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यासारख्या नेत्यांकडे आपण देशाचे भावी पंतप्रधान म्हणून पाहात आहोत, असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाविरोधी राजकीय पक्षांना एकजूट करून, स्थिर सरकार देण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचे शरद पवार म्हणाले. शक्य झाल्यास रालोआतील काही घटक पक्षांनाही सोबत आणण्यावर माझा भर राहील, असे संकेत त्यांनी दिले.
 
 
सर्व पक्षांना सोबत घेतल्यानंतर बहुमताचा आकडा आमच्याकडे असेल. त्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी काय धोरण असेल, यासाठी सर्वांचे मत विचारात घेतले जातील. ज्या पक्षाकडे जास्त खासदार असतील, त्यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यात मी स्वत: लक्ष देणार आहे, कारण मी स्वत:ला दावेदार मानत नाही आणि कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, असेही पवार यांनी सांगितले.