श्रीलंका स्फोटाचे भारत कनेक्शन, एनआयएचा तपास सुरू
   दिनांक :27-Apr-2019
नवी दिल्ली,
 
जगाला हादरवून सोडणार्‍या श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांना भारतातूनही हातभार लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी एनआयए श्रीलंकेच्या सुरक्षा एजन्सींना सहकार्य करत असून, दक्षिण भारतात तपास करत आहे.
 
दक्षिण आशियात भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये इसिसचे अनेक मोड्युल कार्यरत आहेत. मोठ्या प्रमाणात तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना इसिसमध्ये सामील करण्याचे काम या मोड्युल्सकरवी करण्यात येत असते. नॅशनल तव्हीद जमात या संघटनेच्या मदतीने इसिसच्या श्रीलंका मॉड्युलने ईस्टरच्या दिवशी स्फोट घडवून आणले होते. इसिसचा जाहरान हाशीम हा श्रीलंकन दहशतवादी या स्फोटांचा सूत्रधार आहे.
 

 
 
 
 
एनआयएने इसिसच्या कोइम्बतूर मॉड्युलच्या कार्यालयावर नुकताच छापा मारला. या छाप्यात हार्ड डिस्क, लॅपटॉप, सीडी आणि इतर ऐवज जप्त करण्यात आले होते. हे ऐवज सीईआरटी या संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असता आयएसचा म्होरक्या अबु बक्र  याची भाषणें, इसिससंबंधित लेख आणि जाहरान हाशीमचे व्हिडीओ सापडले.
 
जाहरान हाशीमचे व्हिडीओ इस्लामिक स्टेटच्या कोइम्बतूर मोड्युलमधील तरुणांना दाखवण्यात येत होते. जाहरान हाशीम या मॉड्युलच्या संपर्कात असल्याचेही आमच्या लक्षात आले, अशी माहिती एका अधिकार्‍याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिली आहे. यासंदर्भात कोइम्बतूर मॉड्युलशी संबंधित लोकांची अधिक चौकशी करण्यात येणार आहे.
 
दुसरीकडे इसिसच्या केरळ मॉड्युलचाही या स्फोटांशी काही संबंध आहे का, याचा तपास केला जातो आहे. २०१६ मध्ये इसिसच्या केरळ मॉड्युलने युवकांना कुराणाचे शिक्षण देण्यासाठी श्रीलंकेत पाठवले होते. नंतर या सर्व युवकांना अफगाणिस्तानला पाठवण्यात आले होते. यातील बरेचशे युवक अमेरिकी सैन्याच्या हल्ल्यात मारले गेले आहेत. पण, यापैकी जिवंत युवकांनी श्रीलंकेतील स्फोटांच्या तयारीला हातभार लावला का, याचा शोध घेतला जात आहे.