पालकमैत्री...
   दिनांक :27-Apr-2019
चौफेर  
 
 सुनील कुहीकर 
 
 
 
 
परिस्थिती अतिशय भीषण आहे. भविष्यात त्याचे पडसाद कसे उमटतील, येत्या काळात त्याचे परिणाम कसे भोगावे लागतील माहीत नाही. मराठी माध्यमातून शिकून इथवर आलेली पिढी आपल्या पाल्यांना मात्र त्या माध्यमातून शिकवायला तयार नाही. सर्वांची स्वप्नं आकाशाला भिडणारी आहेत. त्यापेक्षा कमी कुणालाच काहीच नकोय्‌. यश, अपयशाचे मापदंड ठरले आहेत. त्या चाकोरीबाहेर जायची तयारी नाही कुणाचीच. बरं, यशाचे आकर्षण इतके की, अपयश थेट युद्धातील पराजयाच्या पंक्तीत जाऊन बसलेलं. त्याच्यातर वाटेनेही जायला नको! विद्यार्थ्यांच्या बाबतीत यशापयशाचे परिमाण परीक्षेत प्राप्त होणार्‍या गुणांवरून तोलण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे, अपयश पदरी पडलेले सुमारे चार हजार विद्यार्थी इथे दरवर्षी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवतात. निदान पन्नास हजार पोरं वेगवेगळ्या कारणांमुळे घरातून पळून जातात. साठ टक्के तरुणाई कुठल्या ना कुठल्या व्यसनाच्या आहारी गेलेली आहे. अश्लील वेबसाईट्‌स बघणे, ही या वयोगटासाठी सामान्य बाब झाली आहे. गावखेड्यातल्या पालकांमध्ये जागरूकतेचा अभाव आहे. तिथे जगण्याच्या विवंचनेनेच इतके घेरले आहे की, मुलांच्या भवितव्याबाबत चिंता वाहायला फुरसत होत नाही कुणाला. याउलट, शहरातील लोक इतके जागरूक झाले आहेत की, पोरांपेक्षाही आईबापालाच पोरांच्या भवितव्याची चिंता लागून राहिलेली असते. बारावीनंतर पोरानं इंजिनीअर व्हायचं की डॉक्टर, हे पालकांनीच ठरवून टाकलेले असते. स्वत:च्या स्वप्नांचे ओझे त्याच्या खांद्यावर टाकून आस लावून बसलेले असतात पालक. प्रसंगी कर्ज काढावे लागले तरी चालेल, पण मोठ्यातल्या मोठ्या कोिंचग क्लासमध्ये पोराला प्रवेश मिळाला पाहिजे. चांगल्यात चांगल्या महाविद्यालयात त्याला एकदा प्रवेश मिळाला की आयुष्याचं ईप्सित साध्य झाल्याच्या समाधानात न्हाऊन निघायला मोकळे सारे. आयुष्य म्हणजे जणू शर्यत होऊन बसले आहे. परिणाम सरळ आहे. जिंकण्यासाठी धावणार्‍यांची गर्दी जमली आहे सर्वदूर. मुलांनी अभ्यासात हुशार असलं पाहिजे. शिवाय त्याला क्रीडा, संगीत, नृत्यादी कलाविष्कारही साधता आला पाहिजे.
 
एकूण, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व साध्य करण्यासाठीचा त्याचा ध्यास असला पाहिजे, यासाठी सारा अट्‌टहास. त्यासाठी हवे ते करण्याची तयारी. आपल्या आयुष्यात आपल्याला जे मिळालं नाही ते सारंकाही मुलांना देण्याच्या नादात सारेच भरकटताहेत...
शहरात बॉयफे्रण्ड-गर्लफ्रेण्डची संकल्पना नेमकी कुठवर पोहोचली आहे, याचा अंदाज बांधायचा असेल, अंदाज कशाला वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल, तर एकदा मेडिकल शॉपच्या बाहेर उभे राहून फक्त निरीक्षण करा. कुठल्या वयाची मुलं कोंडोम्स खरेदीसाठी येतात, त्यात युवतींचे प्रमाण किती असते, याचे अवलोकन केले तर भयानक वास्तव समोर येईल. बीअरशॉपीतील तरुणांच्या गर्दीपासून, तर ड्रग्सच्या विळख्यात सापडलेल्या युवकांपर्यंत... सारेच अतर्क्य, धक्कादायक आहे. सारी सुखं पैशानं विकत घेऊन पायाशी उधळण्याच्या धडपडीत पोरांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवण्याचं राहूनच चाललं असल्याचं भान मात्र हरपत चाललं आहे. आई-वडील दोघेही कमावते असलेल्या घरात तर चित्र आणखीच विदारक. स्वीगी, झोमॅटोवरून वाट्‌टेल त्या हॉटेलातून पाहिजे ते खाद्यपदार्थ मागवण्याची अन्‌ खाण्याची मुभा आहे. आईच्या हातची चव तेवढी हरवली आहे. गोष्ट सांगणार्‍या आजीची जागा आई-बाबांच्याही वाट्याला आलेली नाही. ती इंटरनेट आणि मोबाईलने मिळवली आहे कधीचीच. त्या माध्यमातून पुढ्यात नेमकं जे मांडलं जातंय्‌, ते कुणाच्याच नियंत्रणात राहिलेलं नाही आता. घडीभराची फुरसत नसलेली माणसं तासन्‌तास या मायाजाळात गुरफटलेली असतात. राहिला प्रश्न पालकांचा, तर आपण आपल्या घामाच्या पैशातून आपल्या मुलांसाठी ही सुविधा निर्माण करू शकलोय्‌, याचंच फक्त समाधान त्यांच्या चेहर्‍यावर असतं. यशाची स्पर्धा इतकी खोलवर रुजलीय्‌ की, सुमार दर्जामुळे शिक्षणाचे खोबरे झाले तरी प्रत्येकालाच इंजिनीअर किंवा  डॉक्टर व्हायचं आहे. हो! कारण त्याच्यापलीकडेही शिक्षणाची दालनं खुली असल्याच्या वस्तुस्थितीचेही भान हरपले आहे केव्हाच.
 
 
 
 
शिक्षण... ते दर्जेदार असलंच पाहिजे, याची गरज नाही. हा, शैक्षणिक संस्था मात्र नावारूपाला आलेलीच हवी. प्रवेश तिथेच मिळायला हवा. मग पैशाचा कितीही पाऊस पाडावा लागला तरी चालेल. त्यासाठी मेहनत करावी लागली, राजकीय दबाव आणावा लागला, संबंध वापरावे लागले तरी चालेल. शिक्षणानंतर नोकरी. करीअर. लग्न. मग सुखाचा संसार. बस्स! एवढं झालं की, जणू जीवनाचे ईप्सित साध्य झाल्याचीच अनुभूती... या वावटळीत, अनेकांच्या बाबतीत तंबाखूपासून तर बीअरपर्यंत अन्‌ सिगारेटीपासून तर ड्रग्जपर्यंतचा प्रवास कुठून सुरू झाला, कुठवर येऊन पोहोचला, याचा अदमासच घेता येत नाही पालकांना.
मुलं व्यसनाधीन कशी होतात, घरून मिळणारा पैसा खूप जास्त असेल तरी िंकवा तो कमी पडत असेल तरी ती वाईट मार्गाने कशी वळतात, ती िंहसक कशी बनतात, घरून पळून जाण्याची िंहमत त्यांच्यात येते कशी... या सर्वांची कारणं परिस्थिती, पैसा, संस्कार आणि शेवटी पालकांपाशी येऊन थांबतात. सुखाची उधळण करण्याच्या नादात हवे तिथे टोकायचे राहून जाते, चुकांवर बोट न ठेवण्याची चूक भविष्यात भोवते. मुलांवर स्वत:च्या वर्तणुकीतून अप्रत्यक्षपणे संस्कार रुजविण्याच्या पद्धतीचा अभाव कित्येक प्रश्न निर्माण करून जातो. पालक आणि पाल्यांमधील संवादाच्या अभावातूनच कित्येक समस्या उद्भवलेल्या असतात खरंतर. कारण त्या संवादातूनच स्वत:कडे, समाजाकडे बघण्याची दृष्टी बदलते. सभोवतालच्या लोकांना गृहीत धरण्याची, न धरण्याची तर्‍हा बदलते. त्यांच्यासाठी काहीतरी करण्यासाठीची धडपड सुरुवातीला मनात अवतरते अन्‌ कृतीतून व्यक्त होते. आताशा समाजासाठी मूठभर काही केले की, त्याचा पसाभर गवगवा करण्यात धन्यता मानणार्‍यांची गर्दी उदंड झाली आहे. काही लोक तर, कशाशीच काहीच घेणेदेणे नसल्यागत वागतात. निर्विकार. मुद्दा, मुलं एकत नसल्याचा असो, की मग त्याने पानठेल्यावर चकाट्या पिटत दिवस वाया घालवण्याचा. विषय, त्याचे मन अभ्यासात न लागण्याचा असो, की मग त्यांनी गर्लफे्रण्ड-बॉयफ्रेण्डच्या नादात अडकण्याचा, दोष पालकांचाही तितकाच. या दाहक वास्तवातून साकारली ती पालकमैत्रीची संकल्पना- नागपूरच्या डॉ. संध्या पवार यांच्या कल्पनेतून.
 
डॉ. संध्या पवार. एक आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व. तशा तर संध्याताई पीएच्‌. डी. झालेल्या. पण, जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवतात. आता जिल्हा परिषदेची शाळा हा काय कौतुकाचा विषय? पण, त्यानिमित्ताने गावखेड्यातल्या समस्यांशी सामना झाला. तिसरी-चौथीत शिकणारी मुलं तंबाखू, गुटखा खातात. हाणामार्‍या करतात. बिनधास्तपणे चाकू-छुरे काढतात. दादागिरी करतात. अभ्यासाच्या बाबतीत पालकांनी लादलेल्या अपेक्षांचे ओझे पेलवले नाही की, महाविद्यालयातही याच पद्धतीने मर्दुमकी सिद्ध करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांकडून होतो. या मुलांना तंबाखूच्या व्यसनापासून रोखण्याचा प्रयत्न संध्याताईंनी केला. एक-दोन नव्हे, तब्बल तीनशे शाळांमधून जागृतीकरिता भाषणं दिली. ते करताना लक्षात असं आलं की, कित्येक घरात पालकांपासूनच या सवयीचा प्रवाह सुरू झालाय्‌. मग मुलांकरवी तो तिथेच थांबवण्याचा प्रयत्न झाला. बदलत्या काळातील मुलांच्या वाईट सवयींबाबत पालकांचे प्रबोधन करण्याचा प्रयोग सुरू झाला तो याच अनुभवातून. नंतरच्या काळात राजेश वैरागडे व इतरांची साथ लाभत गेली आणि पालकमैत्रीचा उपक्रम काळानुरूप बदलांसह अंमलात येत राहिला. या माध्यमातून शाळा-शाळा, वस्त्या-वस्त्यांमधून पालकांशी संवाद साधला जातो. नुसत्या पैशानं विकत घेतलेल्या सुविधा पदरात टाकून सुखाच्या रेघोट्या ओढत राहिलात तर परिणाम ‘हेच’ दिसतील. सुविधा पायाशी लोळण घेत असतानाही वाट्याला निराशा तेवढी येईल. त्यामुळे स्वप्नांचा बाजार मांडण्यापेक्षा मुलांना वास्तवाशी झगडण्याचे धैर्य आणि बळ देण्याची शिकवण देण्याची गळ पालकांना घातली जाते. शेवटी मुलांच्या डोक्यावर अपेक्षांचे डोंगर तर त्यांनीच उभे केलेले असते ना! पालकमैत्रीचा उपक्रम हा ते ओझे कमी करण्याचा एक प्रयत्न आहे...
9881717833