अमेरिकेने लादले पाकिस्तानवर निर्बंध; व्हिसाही नाकारणार
   दिनांक :27-Apr-2019
वॉशिंग्टन,
 
व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करण्यात आल्यानंतरही, त्यांना परत घेण्यास नकार देणार्‍या पाकिस्तानवर अमेरिकेने निर्बंध लादले असून, यापुढे पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मंजूर न करण्याचे धोरणही अमेरिकेने स्वीकारले आहे.
 
पाकिस्तानने आपल्या नागरिकांना न स्वीकारल्यास आम्ही या देशाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांपासून, तर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कुणालाही व्हिसा मंजूर करणार नाही, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिला आहे.
आम्ही या मुद्यावर पाकिस्तानच्या येथील वकिलातीतील अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. आम्ही लादलेल्या नव्या निर्बंधांची माहितीही त्यांना दिली, पण अद्यापही त्यांच्या व्यवहारात कुठलाच बदल झालेला नाही. त्यामुळे आता आम्ही आणखी कठोर कारवाई करणार आहोत, असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
 

 
 
विशेष म्हणजे, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वास्तव्य करणार्‍या नागरिकांना हद्दपार केल्यानंतर, त्यांचा स्वीकार करण्यास नकार दिल्याबद्दल अमेरिकेकडून कारवाई करण्यात आलेला पाकिस्तान हा दहावा देश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशा आठ देशांवर व्हिसा नाकारण्याची कारवाई अमेरिकेने केली होती, यावर्षी घाना आणि पाकिस्तान या देशांचा या यादीत समावेश झाला आहे. यापूर्वी गुयाना, गांबिया, कंबोडिया, एरिट्री, बर्मा आणि लाव्होस यासारख्या देशांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.
 
अलीकडील काळात पाकिस्तानच्या काही नागरिकांना व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वास्तव्य करण्याच्या आरोपात ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या हद्दपारीचा आदेश जारी करतानाच, या नागरिकांना पाकिस्तानने आपल्या देशात परत नेण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पाकिस्तानच्या उच्चायोगाला केली होती, पण तसे काही करण्यास उच्चायोगाकडून नकार देण्यात आला होता. पाकिस्तानला आम्ही यासाठी आणखी काही मुदत देण्यास तयार आहोत, या देशाने आपल्या व्यवहारात बदल करावा, असे आम्हाला वाटते, त्यानंतर पाकिस्तानच्या अधिकार्‍यांनाही व्हिसा नाकारण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल, असे अधिकार्‍याने स्पष्ट केले.