वैभव मांगलेंना नाटका दरम्यान भोवळ
   दिनांक :27-Apr-2019
सांगलीतल्या भावे नाट्यगृहात अभिनेते वैभव मांगले भोवळ येऊन कोसळले. या नाट्यगृहात अलबत्या गलबत्या या नाटकाचा प्रयोग सुरू होता. त्याचवेळी वैभव मांगले स्टेजच्या बाजूला कोसळले. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर मांगले यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर अलबत्या गलबत्या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला. मांगले यांना डिहायड्रेशनमुळे चक्कर आली अशी माहिती अभिनेते आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी दिली.

 
 
वैभव मांगले यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त चुकीचं असल्याचंही चिन्मय मांडलेकर यांनी सांगितलं. अलबत्या गलबत्या नाटकात वैभव मांगले यांची महत्त्वाची भूमिका आहे. हे नाटक कलाकाराला थकवणारं आहे त्यामुळे त्यांना त्रास झाला असावा मात्र खोटे वृत्त पसरवू नका असेही आवाहन मांडलेकर यांनी केले. वैभव मांगलेंवर उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती निर्माते राहुल भंडारे यांनी दिली आहे.