उद्या ‘जागतिक कार्यस्थळ सुरक्षा व आरोग्यनिगा’ दिन
   दिनांक :27-Apr-2019
 नागपूर: उद्या  28 एप्रिल! ‘जागतिक कार्यस्थळ सुरक्षा व आरोग्यनिगा’ दिन! हा दिवस दरवर्षी 28 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. कार्यस्थळ अर्थात कामकाजाच्या ठिकाणी होणार्‍या दुर्घटना व उद्भवणारे आजार यांना प्रतिबंध घालण्यासाठी हा दिन साजरा करण्यात येतो. कार्यस्थळांमध्ये कारखाने वा कार्यालये यांचा समावेश होतो.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेतर्फे (‘आयएलओ’ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन) सन 2003 पासून ‘जागतिक कार्यस्थळ सुरक्षा व आरोग्यनिगा’ दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. आयएलओ ही संयुक्त राष्ट्राची संस्था असून, 187 देश तिचे सदस्य आहेत. स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे आयएलओचे मुख्यालय आहे. या वर्षीचे म्हणजे 2019 चे ‘जागतिक कार्यस्थळ सुरक्षा व आरोग्यनिगा’ दिनाचे घोषवाक्य ‘सुरक्षा आणि आरोग्य व कामाचे भवितव्य’, असे आहे.

 
 
 
दरवर्षी 27.8 लाख लोकांचा मृत्यू
संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालानुसार, दरवर्षी औद्योगिक दुर्घटना आणि धोकादायक कामांमुळे होणारे आजार, यांच्यामुळे जगभरात 27.8 लाख लोकांचा मृत्यू होतो. हजारो लोकांना मृत्यूच्या खाईत ढकलणारी 1984 ची भारतातील भोपाळ वायू दुर्घटना जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक दुर्घटनांपैकी एक होती. या दुर्घटनेमुळे हजारो पीडित आणि त्यांची पुढील पिढी श्वसनसंबंधी आजारांशी संघर्ष करीत आहे. अन्य मोठ्या औद्योगिक दुर्घटनांमध्ये चेर्नोबिल आणि फुकुशिमा अणू प्रकल्प दुर्घटनांचा समावेश होतो.
तंत्रज्ञान बदलाची मानसिकता स्वीकारावी
कार्यस्थळी योग्य सुरक्षा बाळगल्यास होणारे अपघात, घडणार्‍या संभाव्य दुर्घटना रोखल्या जाऊ शकतात. तसेच, गंभीर आजारांनाही प्रतिबंध होऊ शकतो. विविध प्रकारचे बदल स्वीकारून विशेषत: तंत्रज्ञानातील बदलांचा स्वीकार करून, दुर्घटना आणि आजार टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आयएलओ करीत असते.
जबाबदारी एकाची नसून, सर्वांचीच!
कामाच्या ठिकाणी होणार्‍या दुखापतींची नोंद बरेचदा होत नाही. मात्र, वाढलेली जागरुकता, माध्यमांचा दबाव आणि कायद्यातील शिक्षेचा जरब ही महत्त्वाची ठरते.
भारतात कार्यस्थळ सुरक्षितता आणि आरोग्यविषयक कायदे आहेत. महाराष्ट्रात औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाकडेही जबाबदारी आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, भारतात कठोर सुरक्षा दर्जा लागू करण्याची तातडीची गरजही आहे. त्यांच्या मते, पाश्चिमात्य राष्ट्रातील सुरक्षा मानदंडांची अंमलबजावणी आपल्याकडेही करावी लागेल. थेट विदेशी गुंतवणूक करणार्‍या कंपन्या हल्ली यासाठी आग्रही असतात, हे येथे उल्लेखनीय. कामाच्या ठिकाणी आपले आयुष्य आणि मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही कुणा एकाची नसून, सर्वांचीच आहे, हे येथे लक्षात घेणे महत्त्वाचे!