यावेळच्या निवडणुकीत २२.७ लाख जवान तैनात
   दिनांक :28-Apr-2019
सतराव्या लोकसभेसाठी 2.7 लाख निमलष्करी दले व 20 लाख राज्य पोलिसांना निवडणुकीच्या कामी तैनात करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
निवडणुका निष्पक्ष आणि मोकळ्या वातावरणात व्हाव्यात यासाठी केंद्रीय दलाचे 2 लाख 70 हजार जवान तर 20 लाख राज्य पोलिस दलाचे जवान तैनात करण्यात आले असून आतापर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासातील ही सर्वाधिक संख्या आहे.
निवडणूक आयोगाने मागणी केल्यानुसार देशात विविध ठिकाणी निमलष्करी दलाच्या 2710 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्राची सुरक्षा, मतदान साहित्य संबंधित केन्द्रावर पोचविणे, वाहतूक आणि स्ट्रॉंग रूमची सुरक्षा याकामी ही पोलिस दले तैनात करण्यात आली आहेत. एका राज्यात निवडणूक संपली की, दुसर्‍या राज्यात या निमलष्करी दलांना तत्काळ पाठविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
 
 
 
 
प्रामुख्याने जम्मू-काश्मीर आणि पश्चिम बंगाल ही दोन्ही राज्ये पूर्णणे अतिसंवेदनशील आहेत. त्यापैकी एकट्या पश्चिम बंगाल राज्यात 41 हजार निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
निमलष्करी दलांमध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा बल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि इंडियन रिझर्व्ह बटालियनच्या जवानांचा समावेश आहे, असे गृहमंत्रालयाने सांगितले.
मतदान केंद्राचा स्टाफ संबंधित स्थळी पोचविण्यासाठी रेल्वे कोचेस, ट्रक्स, हेलिकॉप्टर्स यांचीही मदत घेतली गेली आहे. लोकसभेची निवडणूक 11 एप्रिलला सुरू होऊन 19 मे रोजी मतदान संपणार आहे. तोपर्यंत ही सर्व दले तैनातीस असणार आहेत.