राष्ट्रवाद प्रज्ञासिंग विरुद्ध दिग्गीराजा
   दिनांक :28-Apr-2019
सुधीर पाठक
8888397727
 
भोपाळ या लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसने त्यांच्याच पक्षातील वाचाळवीर व कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांचे राजकीय गुरू दिग्विजय सिंह यांना उमेदवारी दिली. दिग्गीराजा हे त्यांच्या मुस्लिम अनुनयासाठी तसे कुप्रसिद्ध आहेत. 9/11 ला अमेरिकेतील ट्विन टॉवरवर हल्ला झाला व ते उद्ध्वस्त झालेत. त्या संपूर्ण कटाचा सूत्रधार लादेन होता. या लादेनला पुढे अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबाद येथे घुसून संपविले. त्या लादेनला ‘लादेन’जी असे आदरार्थी संबोधन वापरणारे संपूर्ण भारतात फक्त एकमेव दिग्गीराजा होते. दिल्लीला बाटला हाऊस चकमक झाली. त्यात पोलिस निरीक्षक मोहनचंद शर्मा शहीद झाले. त्या चकमकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे व मोहनचंद यांच्या शहीदत्वावर शंका घेणारे फक्त दिग्गीराजा होते. भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोगही दिग्गीराजांनी केला. नक्षलवादी चळवळीतील जे कार्यकर्ते-नेते पकडले गेले, त्यावेळी त्यांच्याजवळ जे फोन नंबर सापडले, त्यात एक नंबर दिग्गीराजांचा होता. नक्षल समर्थकांना जवळची वाटणारी व संकटात मदत करणारी जी मंडळी होती, त्यात दिग्गीराजांचा समावेश होता. अशा विकृतबुद्धी दिग्गीराजाला भोपाळमधून उमेदवारी दिली जाताच भाजपाने वेगळा विचार सुरू केला आणि जवळजवळ शेवटच्या क्षणी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ही लढत राष्ट्रवादी शक्ती विरुद्ध राष्ट्रहितविरोधी शक्ती यांच्यात होत असल्याची भावना सर्वत्र झाली.
 
सर्व राष्ट्रवादी शक्ती साध्वी प्रज्ञासिंग यांच्या बाजूला एकवटल्या, तर त्यांना विरोध करणार्‍या शक्ती दिग्गीराजा यांच्या भोवती उभ्या झाल्यात. माध्यमांनी साध्वी प्रज्ञासिंग यांना भाजपाने उमेदवारी देताच दहशतवादी व्यक्तीला उमेदवारी कशाला, असे सवाल उभे करणे सुरू केले.
 
साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल श्रीकांत पुरोहित यांना दहशतवादी कारवायांसाठी कॉंग्रेस-संपुआच्या राजवटीत अटक करण्यात आली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, समझोता एक्सप्रेस बॉम्ब प्रकरण यात त्यांना आरोपी करण्यात आले. विशिष्ट मुदतीत त्यांच्यावर आरोपपत्र ठेवले. कायद्याने जरुरी होऊ नये म्हणून मोक्का लावण्यात आला. दहशतवादी मानून त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात यापूर्वी ज्या काही जणांना अटक करण्यात आली होती, त्यांना या दोघांच्या व स्वामी असीमानंदांच्या अटकेनंतर मुक्त करण्यात आले. न्यायालयात त्यांच्यावरील खटले नंतर मागे घेण्यात आले. भगवा आतंकवाद ही संकल्पना राबविण्यासाठीच प्रतीक म्हणून या तीन अटकांकडे बघता येईल. पण अटकसत्राची मूळ कल्पना कॉंग्रेसमधील काही मुखंडांना कशी सुचली हे बघायला गेले तर आपल्याला फ्रान्समधील इतिहास बघावा लागतो. पार 1895 सालापावेतो मागे जावे लागते. 1895 साली फ्रान्समध्ये ज्यू विरोधी आग भडकली होती. त्याची परिणती आल्फ्रेड द्रेफ्यू प्रकरण उद्भवण्यात झाले होते. द्रेफ्यू हा पस्तीस वर्षांचा अधिकारी कॅप्टन या पदावर कार्यरत होता. पॅरिसच्या लष्करी कचेरीत तो काम करीत होता. त्याच्यावर बारा नकाशे चोरण्याचा आरोप करण्यात आला. त्यासाठी खोटीनाटी कागदपत्रे बनविण्यात आलीत. लष्करी कचेरीत कुणाला तरी लाच देऊन ही कागदपत्रे बनविण्यात आलीत. त्या पत्रात होते की, डी नावाच्या व्यक्तीने हे नकाशे पुरविलेत म्हणून त्याला व तो नसल्यास त्याच्या आईला तीनशे फ्रँक्स द्यावेत.
 
द्रेफ्यूला गुन्हेगार ठरविण्याची प्रक्रिया सुरू झाली. 15 ऑक्टोबर 1894 ला त्याला पकडण्यात येऊन शेर्शेमिरी येथील लष्करी कारागृहात डांबण्यात आले. खटला प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी पॅरिसमधील वृत्तपत्रांनी त्याच्यावर शिव्याशापांचा वर्षाव सुरू केला. (आठवा साध्वी प्रज्ञासिंग व कर्नल श्रीकांत पुरोहित व स्वामी असीमानंद यांच्यावरही माध्यमातून असाच प्रकार झाला होता.) द्रेफ्यू हा जर्मनीचा हस्तक म्हणून वावरत होता, असे सरकारतर्फे माध्यमांना सांगण्यात आले. त्याने कबुलीजबाब लिहून दिला आहे, असेही बातम्यांतून येऊ लागले. त्याच्यावर प्रेम प्रकरणाचे आरोप झालेत, त्याला वृत्तपत्रांनी स्त्रीलंपट ठरविले. (सुदैवाने असे या तिघांबाबत भारतात झाले नाही.) वातावरण इतके तापविण्यात आले की, फ्रान्समध्ये फाशीची शिक्षा रद्द झाली असूनही त्याला फासावर लटकवा अशी मागणी होऊ लागली. वातावरण ज्यू विरोधी करण्याकडे सर्व भर होता. (आपल्याकडे अनेक महाभाग भगवे दहशतवादी असे साध्वी व कर्नल पुरोहित यांना संबोधित होते.)
 
खटल्याची सुनावणी सुरुवातीला पुराव्याअभावी रखडली. नंतर बनावट पुरावाही न्यायाधीशांनी बेकायदेशीर मार्गे स्वीकारला व द्रेफ्यू याला देशद्रोहाबद्दल काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याची रवानगी डेव्हील्स आयर्लंडला करण्यात आली. ही रवानगी करण्यापूर्वी द्रेफ्यूची जाहीर विटंबना करण्यात आली. चौथर्‍यावर द्रेफ्यूला उभे करून हजारो लोकांच्या साक्षीने त्याची लष्करी मानचिन्हे ओरबाडण्यात आलीत. द्रेफ्यूची जन्मठेप सुरू झाली. 3 जून 1899 ला फ्रान्समधील पूर्ण पीठाने निर्णय दिला की, द्रेफ्यूची शिक्षा रद्द करून त्याला लष्करी न्यायालयापुढे उभे करावे. जवळजवळ साडेबारा वर्षांनंतर द्रेफ्यूला न्याय मिळाला. त्याला नंतर मेजर म्हणून पुन्हा लष्करात घेण्यात आले. या प्रकरणातील पडझड होतानाच फ्रान्सने विसाव्या शतकात प्रवेश केला होता. 
 
 
या द्रेफ्यू प्रकरणाशी साधर्म्य प्रज्ञासिंग व कर्नल पुरोहित यांच्या प्रकरणाचे आहे. या दोघांवरील मोक्का रद्द झाला आहे. दोघेही जामिनावर मुक्त आहेत. साध्वी प्रज्ञासिंग यांना जामीन देताना राजकीय चळवळीत व निवडणुकीत सहभाग नको असे कुठलेही निषेध घातले गेलेले नाहीत. तरीही साध्वी प्रज्ञासिंग यांना भाजपाने उमेदवारी देण्याला माध्यमातून प्रखर टीका सुरू झाली आहे. पण भाजपा मात्र अविचल आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उमेदवारीचा पुरस्कार केला आहे. इंदिराजींच्या हत्येनंतर शीख बांधवांचा जो नरसंहार करण्यात आला, त्यातील अनेक आरोपी खासदार झालेत. मंत्रीही झालेत. हे सर्व कॉंग्रेसच्या काळात झाले होते. याची जाणीव कॉंग्रेस पक्षाला त्यांनी करून दिली आहे.
 
एक मात्र नक्की आहे, जर दिग्गीराजांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली नसती तर भाजपानेही साध्वी प्रज्ञासिंग यांना उमेदवारी दिलीच असती असे सांगता येत नाही. शिवाय सामान्य माणसांचे आकलन व राजकीय पक्षाचे आकलन यात फरक असतो. साध्वी प्रज्ञासिंग या विद्यार्थिदशेत अ. भा. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या होत्या. त्या समितीच्याही सेविका होत्या. मात्र त्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यामुळेच आपल्या बोलण्याचे माध्यमे ही काय बातमी करतील, याची जाण त्यांना नाही. शिवाय जवळजवळ 9 वर्षे जे भोगावे लागले आहे, जो अतिशय यातनादायी प्रवास आहे, त्याबद्दल विचारले गेले की, संयमाचा बांध फुटतो आणि मग आपली आपबिती सांगता सांगता त्याला जे प्रत्यक्ष सरळ सरळ जबाबदार आहेत, त्याच्याबद्दलचा उद्वेगही बाहेर पडतो. तसेच काहीसे साध्वीच्या प्रतिक्रियेबाबत झाले आहे. मात्र तरीही आपण आता राजकारणात उतरलो आहोत, त्या राजकारणाचे काही नियम आहेत, त्या नियमाचे पालन केलेच पाहिजे.
 
साध्वीच्या दोन प्रतिक्रियांबाबत त्यांना निवडणूक आयोगाने नोटिसा बजावल्या आहेत. त्याचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे. तसेच न्यायालयातही त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज झाला आहे. त्या सर्वांचा निकाल यथासमय लागेल. मात्र यातील कुठल्याही प्रकरणात त्यांची उमेदवारीच रद्द होईल अशी स्थिती नाही. मात्र त्यांच्यावर राजकीय आकसातून अन्याय झाला आहे. जो जुन्या सरकारने, त्यातील काही मंत्र्यांनी केला आहे. त्याला काही पोलिस अधिकार्‍यांची साथ मिळाली आहे, असे जनतेतील एका वर्गाला वाटते आहे हे निश्चित आहे. पण ही सर्व राळ कॉंग्रेसने दिग्गीराजांना भोपाळमधून उमेदवारी देऊन उठविली आहे हे नक्की आहे. दिग्गीराजांच्या वाचाळगिरीला उत्तर देताना भाजपाने नवीन प्रभावी खेळी केली आहे. मात्र साध्वी प्रज्ञासिंग यांनी सावरकरांची शापवाणी लक्षात घेतली पाहिजे. चंद्रशेखर साने यांनी ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकातील पृष्ठ 428 वरील संदर्भ घेत हे नमूद केले आहे.
 
ते लिहितात- स्वातंत्र्यवीर बॅ. विनायक दामोदर सावरकर व अन्य राजबंद्यांचा बंदीपाल बारीने अनन्वित छळ केला. मात्र सावरकरांनी या बारीला त्याचे मृत्यूसमयी क्षमाशील अंत:करणाने श्रद्धांजली अर्पण केली. दैववशात त्यास आपल्याला छळावे लागले असेल. कदाचित आम्ही वेगळ्या परिस्थितीत भेटलो असतो तर आमचे संबंध चांगले असते, असे लिहून बारीच्या पत्नी व मुलीने सावरकरांना दयादर्‌र अंत:करणाने वागवले त्याविषयी चार कृतज्ञतेचे शब्द सावरकरांनी लिहून ठेवले आहेत. बारीचे अंग शेवटी अगदी लोळागोळा होऊन गेले होते आणि अतिशय वाईट प्रकारचा मृत्यू त्यास आला.
 
या बारीच्या हाताखाली असलेला दुष्टातील दुष्ट बंदिवान मिर्झा खान. अशा क्रूर बंद्यांनाच पुढे बढती देऊन इतर कैद्यांवर कामे करवून घेण्यासाठी नेमले असे. बारीची सद्दी संपल्यावर या मिर्झा खानाचीही सद्दी संपली आणि इतकेच नव्हे तर त्याचा एक हातही ठणका लागून पुढे अगदी लुळा पडला. धर्मवेड्या मिर्झा खानच्या मनाने घेतले की, आपण हा छळ केल्याने सावरकरांनी काही शाप देऊन किंवा मंत्र मारून बारीला लुळेपांगळे केले आणि आपल्यालाही हळूहळू पूर्ण लुळे करणार. त्याने सावरकरांना निरोप पाठवला.
 
बडे बाबू, मी आपला अनंत अपराधी आहे. पण आपण मला क्षमा करा आणि माझा हात बरा करा. सावरकर त्याला म्हणाले, शाप, तंत्र, मंत्र यावर माझा विश्वास नाही. तू औषधे घे. त्यानेच बरा झालास तर होशील.
मिर्झा खान अगदी गयावया करत म्हणाला- बडे बाबू, तुम्ही तसे म्हणा आणि माझ्या लुळ्या हाताला स्पर्श करून मला बरे करा. सावरकरांनी त्याच्या हाताला स्पर्श करून म्हटले- तुमचा विश्वास असेल आणि तुमची भावना असेल तर मी ईश्वरसाक्ष सांगतो की, तुमचा हात बरा व्हावा, अशी माझी इच्छा आहे. सावरकर लिहितात- पुढे खरोखरच त्याचा हात बरा झाला. पण तो औषधाने. त्याने मनाने काय घेतले असेल ते असो.
 
बारीच्या पतनानंतर एकतर्फी मुसलमान वॉर्डन नेमणे बंद होऊन हिंदू बंद्यांनाही देखरेखीखाली नेमले जाऊ लागले. हे िंहदू वॉर्डन तुलनेने कमी दुष्ट व कमी क्रूर असत. एकूणच हिंदू-मुस्लिम असा भेदभाव अंदमानला, त्यातही सेल्युलर जेलमध्ये संपला. हा मिर्झा खानही पुढे सेल्युलर जेलमधून सुटला. जाण्याच्या आधी तो चुपचाप गोगलगायीसारखा पडून असे. कोणी टोकले तर म्हणत असे, ‘‘अब क्या बोलना। अब तो हिंदुराज हो गया है।
(संदर्भ- समग्र सावरकर, खंड-2, माझी जन्मठेप, पृष्ठ-428, प्रकाशन वर्ष-1993)
 
अर्थात मिर्झा खानप्रमाणे दिग्गीराजाही असे काही बोलले तर माध्यमे ‘हिंदुराज’चा वेगळा अर्थ घेतील. या सगळ्याचा अन्वयार्थ हाच की साध्वींनी आपला क्षोभ व्यक्त करताना संयमित व क्षमाशील असले पाहिजे. मात्र त्याच वेळी हेही खरे की प्रत्येक जण जीवनात स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणे क्षमाशील असू शकत नाही. सावरकर तर महानच होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही सरकारने त्यांना दोनदा तुरुंगवास घडविला. पाकिस्तानचे लियाकत अली खान भारतात आले असताना सावरकरांना स्थानबद्ध करण्यात आले होते. लियाकत अली खान सुखरूप पाकमध्ये परतल्यावरही त्यांना स्थानबद्ध ठेवले होते. शेवटी न्यायालयात धाव घेतल्यावर त्यांची मुक्तता झाली. महात्माजींच्या खून प्रकरणातही त्यांना निष्कारण गोवण्यात आले. न्यायमूर्ती आत्माचरण यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली. मात्र आजही स्वातंत्र्यवीरांचा त्याग, त्यांचे कर्तृत्व यांचे राजकीय अभिनिवेश बाजूला सारून मूल्यमापन होत नाही. कदाचित निवडणुकीतील विजयानंतर साध्वीमागील शुक्लकाष्ठ संपेल अशी आशा करूया. पण तोवर सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेचे तरी पालन करूया.
 
साध्वी प्रज्ञासिंग आणि दिग्गीराजा यांच्यातील लढत आज माध्यमांमुळे चर्चेची झाली आहे. यात भोपाळ मतदारसंघात मुस्लिम मतदार मोठ्या संख्येत आहेत. अगदी 1984 ला भोपाळ गॅसकांड होऊनही कॉंग्रेसचे के. एन. प्रधान विजयी झाले होते. त्यानंतर मात्र हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला झाला होता. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र प्रकृतीच्या कारणावरून त्यांनी माघार घेतली. आता राष्ट्रवाद की दहशतवाद म्हणजेच साध्वी प्रज्ञासिंग की दिग्गीराजा याचे उत्तर मतदारांना द्यायचे आहे. तत्पूर्वी द्रेफ्यू प्रकरणासारखे हे साध्वी प्रकरण कॉंग्रेसचे कारस्थान आहे काय, याचाही विचार भोपाळकरांना करावा लागणार आहे.
(टीप : पुण्याच्या अभिजित प्रकाशनाने वि. स. वािंळबे यांचे ‘पराजित अपराजित’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात हे द्रेफ्यू प्रकरण अतिशय विस्ताराने आले आहे, ते जरूर वाचावे.)