सामन्यांमध्ये आम्ही योग्य गोलंदाजांना संधी दिली नाही : आंद्रे रसेल

    दिनांक :28-Apr-2019
आयपीएलच्या बाराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाची कामगिरी अतिशय खराब राहिलेली आहे. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये पहिल्या ४ क्रमांकामध्ये असलेला कोलकात्याचा संघ आता गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये कर्णधार दिनेश कार्तिक आणि संघ व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न निर्माण केले गेले. संघातली ही खदखद आता अष्टपैलू आंद्रे रसेलनेही बोलून दाखवली आहे.
 
 
“आमचा संघ चांगला आहे, मात्र तुम्ही चुकीचे निर्णय घेत असाल तर प्रत्येक वेळी तुम्ही सामना हराल. सध्या आम्ही हेच करतोय. माझ्याकडे वेळ असता, तर काही सामन्यांमध्ये आम्ही कसे चुकलो हे मी सांगितलं असतं. काही सामन्यांमध्ये आम्ही योग्य गोलंदाजांना संधी दिली नाही, तसं केलं असतं तर आम्ही सामना जिंकलो असतो.” मुंबईविरुद्ध सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रसेल बोलत होता.