शिवरायांचे आपात्कालीन व्यवस्थापन!
   दिनांक :28-Apr-2019
शिवदीपस्तंभ
डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
9923839490 
 
शिवाजी महाराज किल्ले पन्हाळगडामध्ये अडकून पडले होते. दिवसामागून दिवस उलटत होते. सिद्दीचा वेढा ढिला पडण्याची लक्षणे दिसेनात. नेतोजी पालकरांचे प्रयत्नही अपुरे पडत होते. शाहिस्ताखानाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केलेलीच होती. इंग्रजांपासून स्वराज्याचे सारेच अहितिंचतक हर्षातिरेकाने वेडावले होते. त्यांना खात्रीच होती की- शिवाजी आता सिद्दीच्या तडाख्यातून वाचायचा नाही. सारेच स्वराज्य अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर तरंगत होते. महाराजांना एक गोष्ट कळत होती की- आता फार काळ पन्हाळयावर राहणे स्वराज्याच्या तब्येतीसाठी घातक आहे. तत्काळ काही उपाययोजना करणे गरजेचे होते. अर्थात- राजे त्याचा विचारही करत होतेच. राजांच्या चिंतनाची खोली फार जबरदस्त असावी असे वाटते. त्याला त्यांच्या अभ्यासाची अन्‌ अनुभवाची जोड होती.
 
लहानपणी शिवाजीराजांना श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्णाचे चरित्र फार व्यवस्थितपणे समजाविण्यात आले होते. मला सारखे वाटत राहते की, सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी राजांच्या चिंतनात ही दोन्ही चरित्र येत असतील का? स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या मद्रास (आताचे चेन्नई) कार्यालयात भक्तगणांसमोर केलेल्या कथनात असे म्हटले होते की- श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्णाच्या चरित्राचा कलियुगातील आविष्कार म्हणजे छत्रपती शिवाजी राजे होत. (डॉ. एम. सी. नांजुंदा राव लिखित ‘स्वामी विवेकानंदांचे शिवाजी महाराजांसंबंधी विचार’ या पुस्तकात हा प्रसंग वर्णिला आहे). राजांच्या व्यक्तिगत चारित्र्यात रामाची तर राजकारण कौशल्यात कृष्णाची छाप सातत्याने दिसून येते. पण आता ते स्वतः भयावह वेढ्यात अडकले होते. चिंतनामध्ये गढून गेले होते. काय विचार सुरू असेल तेव्हा? देवकी, वसुदेव, कृष्णजन्म, तुरुंग, पहारे, मोहिनी, टोपली, यमुना, गोकुळ... 

 
 
झाले! राजांची योजना ठरली. आपल्या वकिलाला पाठवून राजांनी सिद्दी जौहरला सांगितले की- माझ्या चुकांची मला जाणीव झालेली आहे. आणि मी उद्या आषाढ कृ. द्वितीयेला आपली भेट घ्यायला गडाखाली उतरतो. जौहरला तेच हवे होते, तो आनंदला. पण संपूर्ण सैन्यामध्ये ही बातमी पसरली की शिवाजी शरण यायला तयार आहे आणि सैन्यात नकळत एक मोहिनी पसरली. सारे सैन्य गाफील झाले. राजांनी आधीच आपले हेर गडाखाली पाठवले होते. हेरांनी अतिशय मेहनतीने गडावरून निसटून जाण्याची वाट शोधून काढली, ती जोखमीची पण निर्मनुष्य होती. राजांनी आपल्या मागे गड भांडता ठेवण्याची व्यवस्था त्र्यंबकपंत भास्कर या जाणत्या व्यक्तीकडे सोपवून त्यांना आवश्यक सूचना दिल्या. प्रतिपदेच्या रात्री पहिल्या प्रहरी साधारण एक हजार मावळे गडावरून खाली उतरले. आता वाट धरायची होती विशाळगडाची. राजे पालखीमध्ये बसले होते. बांदलांचा सरनौबत राहिलेला एक खंदा वीर त्यांच्यासोबत होता.
 
त्याचे नाव होते नरवीर बाजीप्रभू देशपांडे! आश्चर्य म्हणजे त्या रात्री भयानक पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. मार्गसुद्धा अतिशय भयानक असा होता. जागोजागी मोठे प्रस्तरखंड विखुरलेले होते. कड्यांवर शेवाळे साचलेले होते. वाटा नव्हत्याच आणि वाट म्हणून ज्या मार्गाने ही माणसे निघाली होती, ती इतकी निसरडी झाली होती की पाऊल व्यवस्थित पडे ना! अशा भयावह वाटेने हे हजार वीर स्वराज्याचे प्राण घेऊन निघाले होते. राजे पालखीमध्ये बसले होते. गुडघा गुडघा शेवाळे, झोडपून काढणारा पाऊस अन्‌ वार्‍याचा झंझावात, मध्येच कडाडून चमकणारी वीज, सारं वातावरण भयाण झालं होतं. सर्वांच्या हृदयामध्ये कालवाकालव चालली होती की वीज चमकली अन्‌ आपण कुणाला दिसलो तर? घोडे नेता येत नव्हते कारण घोड्यांचा आवाज होतो. त्यामुळे दौडत जायचे होते विशाळगडापर्यंत! अंतर होते-तब्बल 40 मैल! म्हणजेच 65 किलोमीटर.
 
राजांची माणसं दौडत निघाली. अजून वेढा सुरू व्हायचा होता. वीज चमकली की वेढ्याच्या दिशेला जौहरची माणसे नजरेस पडत होती. आता वेढा जवळ येऊ घातला होता. विचार करा सर्वांच्या मनाची काय अवस्था असेल. अंधाराचा फायदा घेऊन ऐन वेढ्याच्या गर्दीतून निसटून जायचे आहे. मार्ग जरी खाचा खळग्यांचा असला तरी िंचता होतीच. पण सर्वच्या सर्व मराठे सुखरूपपणे वेढ्यातून बाहेर पडले. आता सिद्दीची चिंता नव्हती, मराठे बेहाय दौडत सुटले. वाट जरी बिकट होती तरी मुख्य संकट संपल्यामुळे ती जरा सुसह्य झाली होती. आता एकच लक्ष्य, किल्ले विशाळगड! सेना दौडत होती, पावला पावलाने अंतर कमी होत होते. पण इतक्यात झुडुपांमध्ये काही आवाज झाला. जरा मागे वळून पाहिले तर लक्षात आले की काही लोक झुडुपांमधून गडाकडे पळत होते. अर्थात सिद्दी जौहरच्या विलक्षण सेनापतित्वाचे द्योतक, त्याचे जंगलात लपलेले ते गुप्तहेर होते. त्यांनी महाराजांच्या माणसांना पहिले होते अन्‌ आता ते ही वार्ता देण्यासाठी गडाकडे निसटले होते.
 
पाठलाग करण्यात अर्थ नव्हता कारण किती जण आहेत आणि किती जण दौडत निघाले आहेत, हे अंधारात कळणार तरी कसे. एकच मार्ग होता आणि तो म्हणजे अजून वेगाने पुढे जाण्याचा. राजांची माणसे तुफान वेगाने दौडत निघाली. इकडे सिद्दीच्या लोकांनी त्याच्याकडे बातमी पोचविली की गडातून शेकडो माणसे निसटली आहेत व ती विशाळगडाकडे निघाली आहेत. सिद्दीच्या पायाखालची जमीनच सरकली. चार महिने एवढा वेढा आवळून धरला होता, त्याची परिणीती अशा अपयशात होईल, याची त्याला कल्पनाही नव्हती. क्षणभर तर काहीही सुचेना. त्याला सावरायला जरा वेळ लागला. लगेच आपला जावई सिद्दी मसूद याला जौहरने बोलावून घेतले व जवळजवळ तीन हजार सैनिकांसह राजांच्या मागावर पाठविले. मसूद वेगाने निघाला पण शेवाळे व चिखल इतका होता की त्याच्या सेनेचा वेग मंदावला. प्रयत्नांची शर्थ करून त्याची तुकडी बरीच लांबवर गेली. त्याची गिधाडाची नजर राजांच्या तुकडीला शोधात होतीच.
 
अखेर दूरवर त्याला ती सेना नजरेस पडली आणि तो अजून चवताळून उठला. त्याने काही क्षणातच राजांच्या सेनेला घेरले. पालखी अडखळली. राजांच्या सवंगड्यांच्या जीव हेलावला. राजांनी आपल्यावर विश्वास टाकला होता. इतक्या मेहनतीने इथवर पालखी आणली होती आणि आता घटसर्पाने ऐन रस्त्यात पालखी आवळली. मसूदने विचारले- ‘‘पालखीमध्ये कोण बसले आहे ?’’ गोंडा हाती धरलेले महाराज म्हणाले- ‘‘मी आहे शिवाजीराजे भोसले!’’ मसूदचे भानच हरवले. जो फतहखानाला गवसला नाही. जो अफझलखानाला पुरून उरला. आता सिद्यालाही ज्याने धोबीपछाड दिला तो शिवा त्याला गवसला. मसूदला वजिरीची स्वप्ने पडू लागली असतील. मोठ्या अहंकाराने त्याने राजांच्या लोकांना आणि राजांना कैद केले आणि पालखी मागे वळविली. तो छावणीमध्ये पोहोचला. राजे गिरफ्तार झाल्याचे कळताच सगळी छावणी मोहरून उठली. जौहर तर राजांना पाहण्यासाठी आसुसला होता. राजांना त्याच्या तंबूमध्ये पेश करण्यात आले. राजे आता काही क्षणांचेच सोबती होते. स्वराज्य हरले होते. सिद्दी िंजकला होता. राजे तंबूमध्ये प्रवेशले. जौहर, फाजलखान आदी लोक आत होतेच. मशालीच्या उजेडात राजे आले अन्‌ फाजलखानाने ओळखले की हा शिवाजी नाही. कारण त्याने राजांना जवळून पाहिले होते.
 
जौहर तर हे पाहून हादरलाच. त्याला काहीही सुचेना. तरीही त्याने दरडावून विचारलेच की- ‘‘कोण आहेस तू?’’ राजे उत्तरले- ‘‘मी शिवा!’’ जौहर कडाडला- ‘‘खरे बोल!’’ समोरून उत्तर आले- ‘‘मी शिवा काशीद!’’ फजिती! पुन्हा फजिती!! शिवाजी माणूस नाही सैतान आहे, असेच वाटले असेल सिद्दीला. त्याने लगेच मसूदला पुन्हा पाठलाग करण्याची आज्ञा दिली. (शिवा काशीदची कदाचित तिथेच हत्या करण्यात आली.) महाराजांच्या नियोजन कौशल्याचे हे अत्युत्तम उदाहरण होते. असा पाठलाग होणार हे लक्षात घेऊनच राजांनी 2 पालख्या सोबत घेतल्या होत्या. एक पालखी शिवा काशिदांना घेऊन मुख्य मार्गाने निघाली होती, तर दुसरी आधीच आडवाटेने विशाळगडाकडे महाराजांना घेऊन निघाली. पाठलाग झाला तरी तो हमरस्त्यावर होणार हे ओळखून राजांनी अशी अफलातून क्लृप्ती काढली होती.
 
नियोजन करताना अशा प्रकारे 2-3 प्लॅन तयार केले जातात. याला ‘प्लॅन-अे’ आणि प्लॅन-‘बी’ असे म्हटले जाते. पहिल्या नियोजनावर विश्वास नाही म्हणून दुसरे नियोजन करायचे नसते. पण यदाकदाचित पहिले नियोजन फलद्रुप झाले नाही तर दुसरे तयार असावे लागते, यालाच आपण आपात्कालीन परिस्थितील व्यवस्थापन म्हणतो. पहिले नियोजन करताना ज्या ज्या गोष्टींवर ते अवलंबून आहे, त्या गोष्टी आपल्या हातात असल्यामुळे ते कधीही अयशस्वी होणार नाही, हा विश्वास असावाच लागतो. पण बाह्य परिस्थिती आपल्या हातात नसते, त्यामुळे जर नियोजनावर निर्णायक प्रभाव पडणार असेल तर तो निष्प्रभ करण्यासाठी दुसरा प्लॅन तयार असावा. यासाठी आपल्या हातात काय आहे अन्‌ काय नाही, परिस्थिती कशी आहे, संभाव्य धोका कुठून आहे, असा धोका संभवला तर आपल्या ध्येयाकडे जाताना आपल्याला काय बदल घडवून आणावे लागतील, याची स्पष्ट आवश्यक असते.
 
आपल्या शिक्षण, व्यवसाय, नोकरी, जीवनामध्ये जे बाह्य विश्व आहे त्याचा योग्य अंदाज असावा लागतो. उदाहरणार्थ परीक्षेला 2 महिने हाताशी असताना आपण जे नियोजन करतो, ते वेगळे पण अचानक काही कारणाने 20-25 दिवसांचे नुकसान झालेच तर अभ्यास कसा करावा, याचा विचार म्हणजे आपात्कालीन नियोजन! तीन महिन्यांचे ‘टार्गेट’ दोन महिन्यांत पूर्ण करावे लागले तर काय करता येईल, याचा अग्रीम विचार करून ठेवणे. मंगल कार्यासाठी लागणारा पैसा कुठून आणावा याचे नियोजन झाले असताना अचानक काही अडचण निर्माण झाली तर ती व्यवस्था कुठून करावी, याची तरतूद म्हणजेही आपात्कालीन व्यवस्थापन! असे व्यवस्थापन केल्याने अनपेक्षित बदलांचा सामना करता येतो व नुकसान टाळता येते.
 
अफझलखान प्रकरणामध्ये सारी फौज जवळीतच गारद करायचे नियोजन झाल्यावरही जर कुणी चंद्रराव मोर्‍याकडे निसटलेच तर नेतोजी पालकरांनी जनीच्या टेम्बाजवळ त्यांना नेस्तनाबूत करावे, असे ठरले होते. हा याच नियोजनाचा प्रकार होता. राजांनी आपल्या चातुर्याने जौहरला पुन्हा एकदा मात केली होती. तिकडे राजे आता गजापूरच्या घोडिंखडीपर्यंत येऊन ठेपले होते. विशाळगड टप्प्यात आला होता. पण तेवढ्यात सिद्दी मसूदच्या फौजा घोडिंखडीला येऊन धडकल्या. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जातो का, असे वाटू लागले. इथवर सगळे जवळजवळ योजनाबर हुकूम झाले होते, पण आता राजे सुखरूप विशाळगडावर पोहोचतील का हा मोठा प्रश्न होता. (क्रमशः)
(लेखक कार्पोरेट आणि
व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक आहेत.)
••