धरा कापते आहे...!
   दिनांक :28-Apr-2019
गजानन निमदेव 
 
22 एप्रिल रोजी जगभर वसुंधरा दिवस पाळण्यात आला. गेल्या 45 वर्षांपासून हा दिवस पाळण्यात येतो, साजरा केला जातो. पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्यासाठीची पायाभरणी म्हणजे वसुंधरा दिवसाचे आयोजन असते. पर्यावरणसंवर्धनाच्या सार्वजनिक वचनबद्धतेला या आयोजनाने नवसंजीवनी मिळत असते. यंदाही नेहमीप्रमाणेच वसुंधरा दिवस साजरा झाला. ही धरती कशी संकटात सापडली आहे, यावर भाषणं झाली. संकटात सापडलेल्या वसुंधरेला बाहेर काढण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाय करायला पाहिजेत, यावरही सारासार चर्चा झाली.
 
गेली 45 वर्षे हे सातत्याने सुरू आहे. याचा अर्थ काय? वसुंधरेचे योग्य रीतीने जतन करायला हवे, नाहीतर भविष्य कठीण आहे, याची जाणीव आम्हाला 45 वर्षांपूर्वी झाली होती. सातत्याने 45 वर्षांपासून आपण वसुंधरा दिवस आयोजित करीत असूनही या वसुंधरेची अवस्था आज काय झाली आहे, याची कल्पना आपल्याला आहे? 45 वर्षांपूर्वी होती, त्यापेक्षा 45 पट वाईट अवस्था आपणच करून ठेवली आहे या वसुंधरेची! सालाबादाप्रमाणे नुसता वसुंधरा दिवस साजरा करून काम भागायचे नाही. दिवस साजरीकरणाला प्रत्यक्ष कृतीची जोड द्यावी लागणार आहे.
 
सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाचे चटके किती असह्य आहेत आणि पाण्याची किती भीषण टंचाई आहे, याचा अनुभव आपण सगळेच घेत आहोत. पृथ्वी हा एक ग्रह आहे. या ग्रहाचे तापमान वाढतच चालले आहे. वाढत्या तापमानाचा फटका शेतीलाही बसतो आहे आणि मानवी जीवनालाही. ग्लोबल वॉर्मिंग अर्थात ‘भूमंडलीय उत्ताप’ पृथ्वीच्या विनाशासाठी कारणीभूत ठरणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वी अक्षरश: थरथर कापत आहे. पृथ्वी म्हणजेच वसुंधरा दररोज कण्हत आहे. तिचे कण्हणे क्षणोक्षणी वाढतच चालले आहे. या वसुंधरेच्या अंगभूत असलेले जल, वायू आणि आकाश हे सगळे अराजक अशा विकासदृष्टीने जखमी अवस्थेत विव्हळत आहेत. या भूतलावरील प्रत्येक वनस्पती, किडे-माकोडे, मनुष्य असे सगळेच जीव ग्लोबल वार्मिंगच्या तडाख्यात सापडले आहेत. जैवविविधता नष्ट होत चालली आहे. वसुंधरेच्या अस्तित्वावर गंभीर असे संकट निर्माण झाले आहे. नैसर्गिक आपत्ती वाढतच चालल्या आहेत.

 
अवकाळी पाऊस पडतो, गारपीट होते, त्यामुळे पिकांचे नुकसान होऊन शेती आणि शेतकरी संकटात सापडतो, कुठे भूकंपाचे धक्के बसतात, तर कुठे त्सुनामीचा कहर मानवी जीवन उद्‌ध्वस्त करतो. यंदाच्या मोसमात आपण जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश तसेच उख़राखंडात हिमवर्षाव अनुभवला. पण, तो अनैसर्गिक होता. बर्फ पडण्याचा कालावधी संपल्यानंतरही महिनाभर बर्फ पडतच होता. थंडीचा कालावधीही त्यामुळे लांबल्याचे आपण अनुभवले. हे सगळे कशाचे परिणाम आहेत? भौतिक विकासाच्या नावाखाली आम्ही जो उभा धिंगाणा घातला आहे, त्याचे हे दुष्परिणाम आहेत.
 
याचा अर्थ विकास करायचाच नाही का? उत्तर होकारार्थी येणारच नाही. पुढे जायचे असेल, मनुष्यजीवन सुकर करायचे असेल तर विकास करावाच लागेल. चांगले रस्ते तयार करावे लागतील, पूल बांधावे लागतील. पाण्यासाठी धरणं बांधावी लागतील. पण, निसर्गाचा बळी देऊन हे सगळे करणे परवडणारे नाही. एक झाड तोडायचे असेल, तर त्याबदल्यात पाच झाडे लावण्याची अट कृतीने प्रत्यक्षात आणून विकासाची कामं करायला हरकत नाही. भूगर्भातले पाणी वापरून आणि भूतलावरील पाण्याचे साठे संपवून विकास करणार असाल, तर तो मुनष्याच्या जिवावर उठल्याशिवाय राहणार नाही, हे कुणी लक्षात घेणार आहे की नाही? महाराष्ट्राचाच विचार केला, तर हजारो गावे दुष्काळग्रस्त आहेत. लोकं स्थलांतर करीत आहेत. कारण, पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, जनावरांनाही प्यायला पाणी नाही, खायला चारा नाही. यासाठी आपण कुठल्याही सरकारला जबाबदार धरू शकत नाही. आपणच नैसर्गिक साधनसंपत्तीचा दुरुपयोग केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे, हे विसरून चालणार नाही.
 
ज्येष्ठ वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग आज आपल्यात नाहीत. पण, पृथ्वीशिवाय अन्य कुठल्या ग्रहावर मानवाला जीवन जगता येऊ शकते काय, याचा शोध ते हयात असताना घेत होते. पण, आज तर आपली धरा म्हणजे वसुंधरा अर्थात पृथ्वीच व्हेंटिलेटरवर आहे! योग्य उपाययोजना झाल्यात आणि रुग्णाने त्याला प्रतिसाद दिला, तर व्हेंटिलेटरवर असलेला रुग्णही पुढे बरीच वर्षे चांगले जीवन जगू शकतो. त्यामुळे आज व्हेंटिलेटरवर असलेली आपली धरा योग्य उपाय करून वाचविली जाऊ शकते आणि ते आपल्याच हाती आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भारतात या संकटाची चर्चा केली जाते. ती माध्यमांमधूनही होते आणि काही बुद्धिजीवींकडूनही ती केली जाते. नुकत्याच पार पडलेल्या वसुंधरा दिनी देशात अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम झाले. त्या माध्यमातून जनजागृती करण्याचाही प्रयत्न झाला.
 
तो प्रशंसनीय असला तरी त्याच्या मर्यादा लक्षात घेता, मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली नाही, हे वास्तव आहे आणि भारतवासीयांना अजूनही संकटाची तीव्रता लक्षात आलेली नाही, हे भीषण वास्तव आहे. वसुंधरेवर असलेल्या संकटाची चर्चा भारतात केवळ काही बुद्धिजीवींपर्यंत मर्यादित राहणे धोक्याचे आहे. ही चर्चा वरून खालपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. जर्मनी, स्वीडन, बेल्जियम यांसारखे जे छोटे देश आहेत, त्या देशांमधील लहान लहान मुलांनीही ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्याबाबत जनआंदोलन उभारले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या संकटाचा मुकाबला कसा करावा, याबाबत जागरण करीत आहेत. नेदरलॅण्डमध्ये तर मोठे आंदोलन उभे झाले. लाखावर लोक रस्त्यांवर उतरले. ग्लोबल वॉर्मिंगविरोधातले हे आंदोलन आता युरोपातून अमेरिकेकडे वळण्याच्या तयारीत आहे. भारत आणि आपण सगळे भारतवासीय यापासून काही प्रेरणा घेऊ शकतो का? घेणार असू तर आपले भविष्य उज्ज्वल आहे आणि नसेल तर वेगळे सांगण्याची गरज नाही.
 
निसर्ग हा तसा संतुलित आहे. निसर्गाचे काही नियम आहेत. काही संकेत आहेत. ते पाळायचे असतात. निसर्ग हा अराजक माजवत नाही. मनुष्याने त्याचे दोहन अति केल्याने तो कोपल्याचे आपल्याला जाणवते आहे. ज्या भागात अधिक वायू आहे, तो कमी असलेल्या भागाकडे वाहतो, पाणी वरून खालच्या दिशेकडे वाहते. निसर्गाची जी मूळ व्यवस्था आहे ना, ती अतिशय शिस्तबद्ध आहे. त्या शिस्तीला तडे देण्याचे पाप स्वत:ला बुद्धिमान समजणार्‍या मनुष्याने केले आहे. निसर्गाचे जे नियम आहेत, ते पाळले तर सगळी शिस्त कायम राहील, संतुलन टिकून राहील.
 
आज आपण ज्या आपदांना सामोरे जातो आहोत, तसे प्रसंग उद्‌भवणार नाहीत. मनुष्यजीवन सुकर करण्यासाठी औद्योगिक विकास आवश्यक असला, तरी निसर्गाचे अतिरिक्त दोहन करून तो परवडणारा नाही, हे आम्ही कधी लक्षात घेणार? पर्यावरणविरोधी औद्योगिक विकास हा मनुष्यासाठी आत्मघात आहे, हे वेळीच लक्षात घेणे गरजेचे आहे. कार्बनच्या उत्सर्जनामुळे आज ओझोनचा थर पातळ होत चालला आहे. त्याचे परिणाम आपण बर्‍याच वर्षांपासून भोगत आहोत. असे असतानाही विकसनशील देश प्रगतीच्या नावाखाली कार्बन उत्सर्जन कमी करण्यास नकार देत आहेत, हे दुर्दैवी होय. अमेरिका आणि युरोपातील देशांनी स्वत:चा संपूर्ण विकास केल्यानंतर ते आपल्याला कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार धरत आहेत, हा आपल्यावर अन्याय असला, तरी पर्यावरणसंरक्षणासाठी आम्ही कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे प्रयत्न करायला हवेत, हे निश्चित!
 
गेल्या 45 वर्षांपासून दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस वसुंधरा दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. 1970 च्या दशकामधील आधुनिक पर्यावरण चळवळीचा जन्म हा दिवस साजरा करण्यातूनच झाला, असे अनेक जण मानतात. त्या काळात अमेरिकन लोक ‘व्ही-8-सेडन’ हे भले मोठे वाहन वापरत असत. या वाहनातून वातावरणात सोडला जाणारा धूर मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण करत असे. त्याचप्रमाणे कारखान्यातूनही अनिर्बंधपणे वातावरणात विषारी धूर आणि कसल्याही प्रक्रियेविना रसायनमिश्रित पाणी आसपासच्या परिसरात सोडले जात असे. त्यांना कायद्याची किंवा माध्यमांची भीती नव्हती. लोकांकडून आणि औद्योगिक क्षेत्राकडून होणारे जल-वायू प्रदूषण याकडे समृद्धीचे प्रतीक म्हणून अभिमानाने पाहिले जात असे. एकप्रकारे प्रदूषणाला सार्वजनिक मान्यताच प्राप्त झालेली होती. अन्‌ हे अतिशय दुर्दैवी होते. त्याचे परिणाम आज संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. निसर्गाचे दोहन करून विकसित झालेले देश आज विकसनशील देशांना पर्यावरणरक्षणाचे धडे देऊन मागास ठेवू पाहात आहेत, हे जरी खरे असले तरी भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाने निसर्गनियम पाळून, अतिरिक्त दोहन टाळून स्वत:चा विकास करायचा ठरवल्यास अवघड काहीच नाही. पर्यावरणसंरक्षण हा एक यज्ञ मानावा आणि या यज्ञात प्रत्येक भारतीयाने आपली प्रयत्नरूपी समिधा टाकावी. असे झाले तर आपण विकसितही होऊ आणि सुरक्षितही राहू.
 
कार्बन उत्सर्जनासाठी विकसनशील देशांना जबाबदार धरणारे अमेरिकेसारखे विकसित देश दिलेली आश्वासनेही पूर्ण करीत नाहीत. त्यामुळे नैसर्गिक आपदांचा मुकाबला हा गरीब आणि विकसनशील देशांनाच करावा लागतो, हे खरे आहे. पृथ्वीच्या दोनतृतीयांश भागावर समुद्र आहे. आज अशी परिस्थिती आहे की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे म्हणजेच भूमंडलीय उत्तापामुळे समुद्रातही गरमी वाढली आहे. तसे पाहिले तर असे मानले जाते की, समुद्र म्हणजे पृथ्वीचे स्पंदित असे निळे हृदय आहे. त्यामुळे समुद्राचे संरक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. आपण ज्या ऑक्सिजनच्या भरवशावर मोकळेपणी श्वासोच्छ्‌वास घेतो ना, त्यापैकी 50 टक्के ऑक्सिजन हा आपल्याला समुद्रातूनच मिळतो, हे वास्तव लक्षात घेतले, तर समुद्राची सुरक्षा किती आणि कशी आवश्यक आहे, हे आपल्या लक्षात येईल. समुद्रात जी वादळं येतात ना, त्यामागे ग्लोबल वॉर्मिंग हे एक मोठे कारण आहे. भारतीय संस्कृतीत पाण्याला अपार महत्त्व आहे.
 
म्हणूनच आपण गंगाजलाचे पूजन करतो, समुद्राचेही पूजन करतो. मनुष्यजीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने जलपूजन केव्हाही श्रेष्ठच! ग्लोबल वॉर्मिंगबाबत सजगता अतिशय कमी असल्याचे दुर्दैवाने आढळून आले आहे. पश्चिम आशियात ग्लोबल वॉर्मिंगचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे, त्याचे दुष्परिणामही लोक भोगत आहेत. पण, याबाबत केवळ 40 टक्के लोकांनाच चिंता सतावते आहे, ही गंभीर बाब आहे. अमेरिकेसह अन्य अनेक देशांच्या बाबतीतही असेच दुर्दैवी चित्र आहे. अजूनही लोकांना ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात आलेला नाही. काहींना आला असूनही ते बेफिकीर आहेत, जे जगाचे होईल ते आपले होईल, चिंता कशासाठी करायची, ही बेजबाबदार वृत्ती धोका वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. म्हणूनच दरवर्षी बसुंधरा दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करायचे, तिथे चर्चा करायच्या, उपाय सुचवायचे आणि प्रत्यक्षात ‘ये रे माझ्या मागल्या...’प्रमाणे वागायचे, हे फार दिवस चालणार नाही. प्रत्येकाने वर्षातून किमान एक झाड लावावे, ते जगवावे, वाढवावे. असे झाले तरच ही धरा सुरक्षित राहील आणि मनुष्यजीवनही सुकर होईल...