गुरप्रीत सिंगने पटकावले रौप्यपदक

    दिनांक :28-Apr-2019
आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ग्रीको-रोमन प्रकारातील ७७ किलो वजनी गटात भारताच्या गुरप्रीत सिंगने आणि ८७ किलो वजनी गटात सुनील कुमारने रौप्यपदक पटकावले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुरप्रीतसमोर कोरियाच्या ह्य़ेऑनवू किमचे आव्हान समोर होते. या लढतीत किमने ८-० असे वर्चस्व राखल्यामुळे गुरप्रीत सिंगला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 
 

 
याशिवाय, भारताच्या सुनील कुमारने ८७ किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. परंतु सुनीलला इराणच्या हुसेन अहमद नुरीशी झुंज देताना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सुनीललादेखील रौप्यवर समाधान मानवे लागले. सुनीलने उपांत्य फेरीत कझाकस्तानाच्या अझामत कुस्तुबायेव्हला ६-६ अशा बरोबरीनंतर तांत्रिक गुणांआधारे अंतिम फेरी गाठली. त्याआधी त्याने ताजिकिस्तानच्या तोखिरझोन ओखोनोव्हला १४-७ असे पराभूत केले.
तसेच १३० किलो वजनी गटातील भारताचा प्रेम हादेखील पदकाच्या शर्यतीत होता. मात्र, प्रेमला कांस्यपदकासाठीच्या झुंजीत कझाकस्तानच्या दामिर कुझेमबायेव्हकडून पराभव पत्करावा लागल्याने त्याचे पदक हुकले.