‘ॲव्हेंजर्स : एंडगेम’च्या स्पॉयलरचा चाहत्यांकडून गेम
   दिनांक :28-Apr-2019
‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’च्या सिरीजमधील ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा शेवटचा चित्रपट असून या चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. त्यासोबतच कथेचा शेवट कोणीही उघड करू नये अशीही चाहत्यांची अपेक्षा आहे. चित्रपट पाहण्यापूर्वीच त्याचा शेवट किंवा त्याची मूळ कथा उघड केल्यास चाहत्यांची फार निराशा होते. हाँगकाँगमध्ये या चित्रपटाची कथा सांगणाऱ्या अशाच एका स्पॉयलरला चाहत्यांनी बेदम मारहाण केली. 
 
 
वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हाँगकाँग इथल्या कॉसवे बे जवळील सिनेमागृहाबाहेर मोठमोठ्याने ओरडून ॲव्हेंजर्स एंडगेमचा शेवट सांगणाऱ्याला चाहत्यांनी मारहाण केली आहे. एकीकडे ॲव्हेंजर्स एंडगेम पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये असलेली कमालीची उत्सुकता पाहता स्पॉयलर्ससाठी असलेला राग स्वाभाविक आहे. ‘ॲव्हेंजर्स एंडगेम’च्या कलाकारांनीही स्पॉयलर्सना कथा उघड न करण्याचे आवाहन केले आहे.