कॅलिफोर्नियाच्या सिनेगॉगमध्ये गोळीबार ; एका महिलेचा मृत्यू
   दिनांक :28-Apr-2019
कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो जवळ एका सिनेगॉगमध्ये गोळीबार झाल्याची घटना शनिवारी घडली. सिनेगॉगमध्ये प्रार्थनेच्या वेळी १९ वर्षीय तरुणाने बेछूट गोळीबार केला. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. तर हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 
 
सिनेगॉगमध्ये गोळीबार करणाऱ्याचे नाव अद्याप देण्यात आलेले नाही. पण गोळीबारानंतर हल्लेखोर कारमधून पळून गेला आणि त्याने स्वतः ९११ क्रमांकावर संपर्क साधून त्यानेच हा गोळीबार केला असल्याचे सांगितले अशी माहिती सॅन दिएगोचे मुख्य पोलीस अधिकारी डेव्हिड निसलेट यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
 
 
कारमधून पळून गेलेल्या हल्लेखोराला रस्त्यात पोलिसांनी गाठले आणि त्याला शरणागती पत्करण्यास सांगितली. त्यावेळी हल्लेखोर स्वतः हात वर करून कारच्या बाहेर आला आणि त्याने शरणागती पत्करली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्या कारमधून AR-type प्रकारची रायफल देखील हस्तगत करण्यात आली आहे.