'या' मालिकेच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाकडून ताकीद
   दिनांक :28-Apr-2019
मुंबई,
 
‘भाभीजी घर पर है’ तसेच ‘तुझसे हैं राब्ता’ या मालिकेच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाकडून ताकीद देण्यात आली आहे. ज्या एपिसोडमधून भाजपचा प्रचार होईल असा संवाद वगळावा. समाज माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह कोणत्याही प्रकारच्या माध्यमावर या मजकूराचा एपिसोड उपलब्ध असणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिले आहेत. आदर्श आचारसंहितेतील तरतुदी आणि भारत निवडणूक आयोगाच्या अन्य निर्देशांचे काटेकोर पालन करण्याची सक्त ताकीद या मालिकांच्या निर्मात्यांना देण्यात आली आहे.
 
 
 
अ‍ॅण्ड टीव्हीवरील ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेच्या ४ आणि ५ एप्रिलच्या तर झी टीव्हीवरील ‘तुझसे हैं राब्ता’ च्या २ एप्रिलच्या एपिसोडमध्ये केंद्र सरकारच्या योजनांचा आणि त्याद्वारे भाजपचा प्रचार करण्यात आल्याची तक्रार काँग्रेसने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे केली होती. त्या तक्रारीची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने या दोन्ही मालिकेच्या निर्मात्यांना नोटीस बजावली होती. निर्मात्यांनी खुलासा आणि संबधित एपिसोड पाहिल्यानंतर विशिष्ट राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या कामगिरीची जाहिरातबाजी करणारा मजकूर असून त्याचा मतदारांवर प्रभाव पडू शकेल, असे निदर्शनास आले. तसेच हा मजकूर पूर्वप्रमाणित करुन घेतला नव्हता. या भागातील मजकुरामुळे आदर्श आचारसंहितेतील नियम आणि तरतुदींचा भंग झाल्याचे निवडणूक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
 
राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दोन्ही मालिकांच्या निर्मात्यांना संबंधित मजकूर वगळण्याचे आदेश दिले. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत कोणताही राजकीय पक्ष, उमेदवाराला लाभदायक ठरेल असा मजकूर प्रसारित करु नये, असे आदेश देण्यात आले आहेत.