सुखदेव धुर्वे कुटुंबीयांचा आशिया विक्रम

    दिनांक :28-Apr-2019
 एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया अंतर पोहून कापले
 स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य
 
 मुंबई: मूळ वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील रहिवासी व नागपूर शहर पोलिस विभागात कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुखदेव धुर्वे यांनी कुटुंबासह आज 28 एप्रिल रोजी मुंबईतील एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे 16 किमी अंतर 4 तास 31 मिनिटात पार करून आशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद केली आहे. असा उपक्रम करणारे धुर्वे कुटुंबीय आशिया खंडात एकमेव ठरले आहे.
 

 
 
 
या साहसी उपक्रमाची सुरुवात सकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी एलिफंटा जेट्टी येथून झाली. या उपक्रमाची नोंद घेण्याकरिता आशियन बुक ऑफ रेकॉर्डचे डॉ. संदीप सिंग, सुनील मयेकर व नील लबडे, माजी उपजिल्हाधिकारी व स्व. वामन दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीर दिवे, धनश्री दिवे, मुंबईचे डीआयजी कृष्णप्रकाश आदी उपस्थित होते.
सार्थक सुखदेव धुर्वे याने सागरात उडी घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर व नील लबडे, संजय बाटवे तांत्रिक भूमिका बजावत होते. प्रत्येक मिनिटाला चारही जलतरणपटूच्या हाताच्या गतीची नोंद घेत होते. सागरावरून घोंगावणारा व उंच उंच उसळणार्‍या खार्‍या पाण्याच्या लाटांची तमा न बाळगता सार्थक प्रति मिनिट 80 आर्म्स या गतीने पोहत होता. मध्ये मध्ये त्याला फििंडग देण्यात येत होते. 4 किमी अंतरानंतर आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व नागपूर पोलिस कॉन्स्टेबल सुखदेव धुर्वे यांनी सागरात झेप घेऊन प्रति मिनिट 100 आर्म्स या गतीने पाणी कापणे सुरू केले. सागरात प्रचंड लाटा असल्याने कधी लाटेवर तर कधी खाली सुखदेव विक्रमासाठी पोहत होते. त्याला त्यांची पत्नी व दोन मुले प्रोत्साहन देत होेते. 9 किमी अंतरानंतर पत्नी वैशाली धुर्वे सागरात झेपावल्या. त्यांनी फ्री स्टाईल या प्रकारात पोहायला सुरुवात केली. सागराचे खारे पाणी तोंडात जाऊन विशिष्ट तंत्राचा वापर करीत अथांग सागरात त्या प्रति मिनिट 10 आर्म्स या गतीने पोहत होत्या. त्यांचे मनोबल वाढविण्याकरिता चिमुकली तन्वी आईला सतत आवाज देत प्रोत्साहित करीत होती. 11 किमीनंतर 9 वर्षीय तन्वीने सागरात उडी घेऊन खार्‍या पाण्याचा त्रास सहन करून विपरीत परिस्थिती प्रति मिनिट 60 आर्म्स या गतीने पोहणे सुरू केले. तिला स्पेस स्वीमर म्हणून प्राप्ती बावनकरने साथ दिली.
 
हे अभियान साखळी पद्धतीने करावयाचे असल्याने शेवटी सुखदेव धुर्वेनी 12 वाजून 25 मिनिटांनी गेट वे ऑफ इंडियाचा किनारा गाठला. गेट वे ऑफ इंडिया येथे विविध क्रीडा व समाजाच्या संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने या यशाबद्दल धुर्वे कुटुंबीयांचे स्वागत करण्यात आले. नागपूर जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव डॉ. संभाजी भोसले यांनी साहसीवीरांचे अभिनंदन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ता विशाल भगत, ज्योती पटेल उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सुधीर दिवे, कृष्णप्रकाश, आदिवासी विकास परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश मडावी, राहुल पांडे, अजय उईके, नानू नेवरे, नागपूर बॉम्ब स्कॉडच्या पीआय वैजयंती मालवदरे आदींचे सहकार्य लाभले. या अभियानाकरिता स्व. वामन दिवे चॅरिटेबल ट्रस्ट, मिहिर सेन स्वीिंमग ॲण्ड स्पोर्टिंग क्लब, कामगार कल्याण, नागपूर शहर पोलिसांनीही सहकार्य केले.
छायाचित्रात : आशिया विक्रम करणार्‍या धुर्वे परिवाराचे अभिनंदन करताना सुधीर दिवे व अन्य
फोटो : डब्ल्यू. 28 एप्रिल अभिनंदन जेपीजी