गुदगुल्या करणारे अस्वल
   दिनांक :28-Apr-2019
यादव तरटे पाटील
वन्यजीव अभ्यासक, दिशा फाउंडेशन, अमरावती.
9730900500
 
छकड्याल्या बैल जुतून बाज्या बुडा तयार झाला की आम्ही पहाटेच गाव सोडायचो. बैलांच्या घुंगरांचा छन, छन आवाज करत छकडा पुढे जायचा. मात्र डोंगरी नदी जवळ येताच माझ्या मनात धडकी भरायची. डोंगरी नदीत लहान भूत माट्या आपली वाट अडवतात, असं मी शाळेत ऐकलेलं. नदीत पोहोचताच घुबडाचा घूऽऽ घूऽऽ घूऽ आवाजही कानी पडायचा. मी छकड्यातच बाबांच्या पोटाशी बिलगून बसायचो. बालपणी बाबाबरोबर दारव्ह्याला रविवारच्या बाजारात जायचा आनंद वेगळाच. एक दिवस असेच आम्ही तिघे बाजारात पोहोचलो. दारव्ह्याच्या टोलीपुर्‍यातल्या मोठ्या लिंबाच्या झाडाखाली बाज्या बुड्याने छकडा उभा केला. झाडालाच बैल बांधून बाबा आणि बाज्या बुडा बाजारात निघून गेले.
 
ते जात नाही तोच एक दरवेशी अस्वल घेऊन छकड्यासमोर उभा झाला. अगडबंब अस्वल पाहून मी घाबरलो. घाबरून डोळ्यात पाणी आलं. तितक्यात गर्दी जमली. चौकात अस्वलाचा खेळ पहायला आजूबाजूच्या खेड्यातले लोक जमले. मला थोडी हिम्मत आली. खेळ सुरू झाला. अस्वल नाचू लागले. तितक्यात भरल्या थैल्या घेऊन बाज्या बुडा आला. बाबाही आले आणि दरवेशाला एक रुपयाची नोट दिली. चार-आठ आणे आपल्या झोळीत जमा करून दरवेशी अस्वलाला घेऊन निघून गेला. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 हा कायदा मध्ये जरी पारित झाला असला तरी कित्येक वर्षे असे खेळ चाललेत. हेच दरवेशी लोक अस्वल पाळत. अस्वलाच्या नाकात वेसण घालून त्याला नाचणे शिकवत. अस्वलाचे हे खेळ एकीकडे गावागावात अन्‌ शहरातही करमणुकीचे व रोजगाराचे होते. मात्र दुसरीकडे मानवाने मुक्या प्राण्यावर केलेली ही क्रूर थट्टा होती. सन्‌ 1990 नंतर कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू झाली आणि अस्वलांचे दारिद्र्य संपले. 

 
 
अस्वल शब्द उच्चारताच आजही त्या आठवणी त्याज्या होतात. मात्र काळ बदलला आणि वेळही बदलली. अस्वलाला आता जंगलात मुक्त फिरताना पाहून मन प्रसन्न होते. मेळघाटच्या निबिड जंगलात एक दिवस अस्वल पाठीवर पिलं घेऊन जातानाच दृश्य बरंच काही सांगून गेलं. मेळघाटातील स्थानिक आदिवासी कोरकू अस्वलाला बाणा किंवा रिच म्हणतात. अस्वलाला मराठीत नडघ, भल्ल, रिस व तिसळ अशी अधिक प्रचलित नसलेली नावेही आहेत. संस्कृतमध्ये अस्वलाला ऋक्ष म्हणून ओळखले जाते. अस्वलाला लॅटिन भाषेत उर्सुस म्हणतात. आपल्याकडील जंगलात आढळणारे अस्वल काळ्या लांब केसाचे, छातीवर गोलसर पांढरा पट्टा असणारे असते.
 
इंग्रजीत अस्वलाला ‘स्लोथ बिअर’ म्हणजेच मराठीत ‘आळशी अस्वल’, असे म्हणतात. अर्सिडी कुळातील अस्वल कुळात सात वंश आणि नऊ प्रजाती आहेत. आशिया, युरोप व अमेरिकेतही अस्वले आढळतात. भारतीय अस्वलाचे शास्त्रीय नाव ‘मेलर्सस अर्सिनस’ असून डोक्यासकट त्याच्या शरीराची लांबी 14 ते 18 मीटर असते. अस्वलाचे उंची 60 ते 90 सेंमी असून वजन 90 ते 115 कि.ग्रॅ. इतके असते. मादीपेक्षा नर मोठा असतो. अस्वलाचे मागचे पाय आखूड असून बोटांवर पांढर्‍या रंगाच्या नख्या असतात. अंगावर लांब व दाट काळे केस असतात. छातीवर ‘यु’ या इंग्रजी अक्षराच्या आकाराचा पांढरा किंवा तांबूस तपकिरी पट्टा असतो. अस्वल जंगलात कोठेही राहते.
 
अस्वल बहुदा निशाचर असून झाडांची फळे, फुले, कीटक, कधीकधी कुजके मांस हे अस्वलाचे खाद्य होय. मध अस्वलाच्या विशेष आवडीचे खाद्य आहे. जंगलात फिरताना झाडावर नख्यांचे मोठे ओरखडे आढळले की तो अस्वलाचा प्रताप आहे, म्हणून समजून जायचं. वाळवीची वारुळेही अस्वलाच्या फार आवडीची आहेत. वारुळे फोडून त्यातली वाळवी खाण्याच्या खाणाखुणा मेळघाट व विदर्भाच्या जंगलात आढळतात. अस्वलाचे नाक अतिशय तीक्ष्ण असते. अस्वलाचा मिलनकाळ उन्हाळा असतो. पिलं तीन वर्षांची होईस्तोवर आईबरोबरच राहतात. अस्वलाचे कमाल आयुष्य सुमारे 40 वर्षे असते.
 
बालपणी अस्वल गुदगुल्या करतो, असं मी ऐकलेलं होत. खरं म्हणजे अस्वलाने त्याच्या तीक्ष्ण नखाने गुदगुल्या केल्या तर आपलं काम तमाम झालंच म्हणून समजा. मानवाने वन्यप्राण्यांच्या बाबतीत अशा अनेक भाकडकथा प्रचलित केल्या आहेत. मेळघाट, ताडोबा, पेंच, ज्ञानगंगा, कोका, ब्राह्मपुरीच्या जंगलात अस्वलांची संख्या बर्‍यापैकी आहे. मेळघाटच्या जंगलात पायी गस्त करताना किंवा पदभ्रमण अनेकदा अस्वलाचा सामना झाला. आपण अस्वलाच्या सुरक्षित अंतरावर असलो तर अस्वल कधीही हल्ला करीत नाही. एकदा बी.एन.एच.एस.चे सहायक संचालक संजय करकरे आणि मी नरनाळा किल्याच्या पायथ्याशी फिरत होतो. धारगड परिक्षेत्रात वन्यप्राण्यांचे पायांचे ठसे दिसण्यासाठी बनविलेल्या इम्प्रेशन पॅडजवळ आम्ही गाडी थांबविली. वन्यप्राण्यांच्या पायांचे ठसे पाहण्यासाठी मी खाली उतरलो. वाघाच्या पायाचे दिसले.
 
मी पाहण्यात मग्न असताना अचानक बांबूच्या बेबटातून अस्वल पुढे आलं अन्‌ मला पाहून थबकलं. मला सुचेनास झालं. अस्वल काही हालचाल करायच्या आत मी गाडीला वेढा घालून उजव्या हाताच्या दाराने गाडीत बसलो. डाव्या हातच्या दाराने मी उतरलो असताना आणि ते दार जवळ असताना मी गाडीला वेढा घालून का बसलो, याचं उत्तर अजूनही मला उत्तर सापडलेलं नाही. अशा अनेक गमतीदार प्रसंगाचा मी साक्षीदार आहे. आज जंगलात माणसांचा वाढता वावर असल्यामुळे अस्वलाच्या हल्ल्यात अनेक माणसे जखमी व प्रसंगी मृतही पावतात.
 
खर म्हणजे मधाचे पोळे, मोहफुले व जंगलातील फळे यावर पहिला हक्क अस्वलाचा आहे. अस्वलाच्या खाद्यावर मानव आपला हक्क सांगताना त्याचा अस्वलाशी सामना होतो. अस्वलाचे खाद्य व पोट भरण्याचे साधन या भूमिकेतून पाहता अशावेळी अस्वल हल्ला करतो. आपल्या अन्नावर आपला हक्क या अस्वलाच्या नजरेतून पाहता ही गोष्ट पटण्यासारखी आहे. मात्र, मनुष्यप्रजातीत बदनाम झालेल्या अस्वलावर हल्लेखोर अस्वल, असे नामकरण करून आपण सहज मोकळे होतो. म्हणून एकदा तरी अस्वलाच्या विश्वात डोकावून पाहण्यास काय हरकत आहे?