पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार
   दिनांक :28-Apr-2019
उष्णतेच्या लाटेमुळे वाढलेल्या तापमानाने सगळेच त्रस्त आहे. कोकण, महाबळेश्वर वगळल्यास सर्वत्र कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याचे आढळून आले. शनिवारी राज्यातील सर्वाधिक तापमान अकोल्यामध्ये (४६.७ अंश सेल्सिअस) नोंदविण्यात आले. सर्वाधिक किमान तापमानाची कोल्हापूरमध्ये (२५.९ अंश सेल्सिअस) नोंद झाली. पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
 
 
वातावरणातील बदलांमुळे शुक्रवारपासून विदर्भातील बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांना उकाडा आता असह्य होत आहे. शनिवारीही विदर्भात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम होता. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान नगर जिल्ह्यामध्ये (४५.१ अंश सेल्सिअस) नोंदविण्यात आले.