बाद फेरी गाठण्याचे दिल्लीचे लक्ष्य

    दिनांक :28-Apr-2019
गुणतालिकेत सर्वात तळाशी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्ध विजय मिळवून बाद फेरी गाठण्याचे ध्येय दिल्लीने जपले आहे. ऋषभ पंतच्या सातत्यपूर्ण फलंदाजीच्या बळावर दिल्लीचा संघ विजेतेपदाच्या दिशेने कूच करीत आहे.
 
 
 
कोलकाता येथे १९ एप्रिलला पराभवाची प्रदीर्घ मालिका खंडित केल्यापासून कोहलीच्या बेंगळूरु संघाने आत्मविश्वासाने कामगिरी केली आहे. फिरोझशाह कोटला स्टेडियम बेंगळूरुसाठी यशदायी ठरत आलेले आहे. कारण या मैदानावरील मागील तिन्ही सामन्यांत बेंगळूरुने विजय मिळवलेला आहे. त्यामुळे बेंगळूरुला हरवणे रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली यांच्या मार्गदर्शनाखालील दिल्लीसाठी फारसे सोपे नसेल.
दिल्लीचा संघ १४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना आणखी एक विजय पुरेसा ठरेल. दिल्लीची घरच्या मैदानावरील कामगिरी फारशी समाधानकारक नाही. परंतु दोन सलग पराभवांनंतर एक विजय मिळवणाऱ्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.
बेंगळूरुने कामगिरीत सुधारणा करीत मागील तीन सामन्यांत अनुक्रमे कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांना पराभूत केले आहे. त्यामुळे आणखी एका विजयासह बेंगळूरुला सातवे स्थान गाठता येईल. त्यांच्या खात्यावर ११ सामन्यांत ८ गुण जमा आहेत.
सामन्याची वेळ: दुपारी ४ वा.
 
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १