IPL 2019 ; कोलकाताची मुंबईशी टक्कर

    दिनांक :28-Apr-2019
ईडन गार्डन्सवर यजमान कोलकाता नाइट रायडर्सला नमवून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटची बाद फेरी गाठण्याचा निर्धार मुंबई इंडियन्सने केला आहे.
 
मुंबई इंडियन्सला बाद फेरी गाठण्यासाठी फक्त एका विजयाची आवश्यकता आहे. कोलकाताविरुद्ध त्यांची विजय-पराजयाची आकडेवारी १८-५ अशी एकतर्फी आहे. याशिवाय सलग आठ सामन्यांत मुंबईकडून कोलकाताचा पराभव झाला आहे. कोलकाताने मुंबईविरुद्ध शेवटचा विजय चार वर्षांपूर्वी मिळवलेला आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच हे दोन संघ आमनेसामने येत आहे.
 
 
कोलकाताने सलग सहा सामन्यांत पराभव पत्करल्यामुळे त्यांच्या घोडदौडीला खीळ बसली आहे. मागील सामन्यात कर्णधार दिनेश कार्तिकने ९७ धावांची सर्वोत्तम खेळी साकारून कोलकाताला १७६ धावांचे लक्ष्य उभारून दिले. परंतु राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी कोलकाताच्या वेगवान माऱ्याचा समाचार घेत हे आव्हान तीन गडी राखून पेलले. रविवारी कोलकाताचा संघ घरच्या मैदानावरील अखेरचा सामना खेळणार असून, पराभवाची कोंडी फोडून चाहत्यांना विजयाची भेट देण्यासाठी ते उत्सुक आहेत.