नागपुरात अपहरण करून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची हत्या
   दिनांक :28-Apr-2019
  
कोंढाळीजवळ सापडला मृतदेह
मारेकरी अज्ञात
 
 
नागपूर: पाचपावली हद्दीतून एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे अपहरण करून त्याची हत्या केल्यानंतर मृतदेह कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कासलाबोडी शिवारातील बडबड्या नदीच्या पुलाखाली फेकून दिल्याची घटना उघडकीस आली.
भूपेंद्रसिंग  उर्फ बॉबी मंजितसिंग  माकन (४६) रा. दीक्षितनगर असे या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे नाव आहे.
भूपेंद्रसिंग हा बॉबी सरदार याच नावाने ओळखल्या जात होता. त्याचे पाचपावली हद्दीत राणी दुर्गावती चौक रोडवर डीटीसी नावाचे ट्रान्सपोर्ट कार्यालय आहे. पूर्वी त्याच्याकडे १३ ते १४ ट्रक होते. त्यावेळी तो रॉकेलचा अवैध व्यावसाय करीत असे. ट्रकच्या टाकीत डिझेलऐवजी तो रॉकेल भरत असे. काही वर्षांपूर्वी त्याने ट्रक विकले, सध्या त्याच्याकडे ३ ते ४ ट्रक होते. ट्रान्सपोर्टचा व्यावसाय कमी झाला तरी त्याचे कार्यालय तेथेच होते. ट्रक विकल्यानंतर त्याने प्रॉपर्टी डीलिंग आणि क्रिकेट सट्टा सुरू केला होता.
रॉकेलच्या अवैध व्यावसायातून बॉबी सरदारने काही वर्षांपूर्वी लष्करीबाग येथील तौफिक नावाच्या एका तरुणाचा खून केला होता. या खुनातून तो निर्दोष सुटला होता. याशिवाय तो आपल्या ट्रान्सपोर्ट कार्यालयात जुगार देखील भरवित असे अशीही माहिती आहे.
२५ एप्रिल रोजी मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या मित्रांसह कार्यालयात होता. बॉबी हा मित्रांसह आयपीएलची क्रिकेट मॅच पाहत होता. बराच उशीर झाल्याने त्याच्या पत्नीने त्याला फोन केला होता. त्यावेळी त्याने मॅच संपली की, १० मिनिटात घरी येतो असे त्याने पत्नीला सांगितले होते. मॅच संपल्यानंतर त्याचे मित्र निघून गेले. सर्वात शेवटी बॉबी आपल्या कार्यालयातून निघाला. बॉबीने आपल्या कार्यालयाचे शटर पाडले आणि कार्यालयाला कुलूप ठोकून तो कारने घरी जाण्यास निघाला. त्यानंतर दहा मिनिटातच त्याचा मोबाईल बंद झाला. मध्यरात्री १२.१० च्या सुमारास त्याच्या पत्नीने बॉबीला फोन केला असता त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता. मित्रासोबत कुठेतरी गेला असेल असे समजून पत्नीने फारसे लक्ष दिले नाही. त्यानंतर २६ एप्रिल रोजी बॉबीची इनोवा कार जरीपटका हद्दीतील कुशीनगर येथील साई मंदिराजवळ बेवारस अवस्थेत मिळून आली. त्यावरून त्याच्या पत्नीने त्याचदिवशी जरीपटका पोलिसात बॉबीची तक्रार केली होती.
 

 
 
जरीपटका पोलिस बॉबीचा शोध घेत असतानाच रविवारी सकाळी कासलाबोडी शिवारातील बडबड्या नदीच्या पुलाखाली एका अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. दरम्यान, बॉबी प्रकरणाचे वृत्त व्हाट्सअ‍ॅपवर फिरत होते. त्यामुळे ही माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांना होती. कोंढाळी पोलिसांनी ही माहिती जरीपटका पोलिसांना दिली. त्यामुळे रविवारी दुपारी बॉबीचे नातेवाईक घटनास्थळी गेले असता त्यांनी बॉबीची ओळख पटविली. बॉबीच्या शरीरावर कसल्याही जखमा नव्हत्या. त्यामुळे गळा दाबून त्याची हत्या करण्यात आली असावी असा संशय आहे.