‘ब्रह्मास्त्र’साठी करावी लागणार प्रतीक्षा; हे आहे कारण
   दिनांक :28-Apr-2019
आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करणा-या चाहत्यांची निराशा करणारी बातमी आहे. होय, ‘ब्रह्मास्त्र’साठी चाहत्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता या चित्रपटाचे प्रदर्शन पुढील वर्षी उन्हाळ्यापर्यंत लांबणीवर टाकण्यात आले आहे.
 
 
‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जी याने स्वत: ही माहिती दिली. ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट २०१९ नाही २०२० मध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटातील संपूर्ण टीम आणि व्हीएफएक्स टीम ग्राफिक्स आणि साऊंड्सच्या कामात बिझी आहे. एक शानदार चित्रपट बनवण्यासाठी टीम दिवसरात्र झटते आहे. या लक्ष्यपूर्तीसाठी येत्या नाताळची रिलीज डेट पुढे ढकलावी लागतेय. २०२० च्या उन्हाळ्यापर्यंत आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करू. प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाल्यानंतरच निश्चित रिलीज डेटची अधिकृत घोषणा केली जाईल, असे अयानने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.