'वास्तव'मधील भूमिका माझ्याच वाट्याची होती : संजय नार्वेकर
   दिनांक :28-Apr-2019
सुप्रसिद्ध अभिनेता संजय नार्वेकरने नाटक आणि सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. नुकतंच त्याने ‘कानाला खडा’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये त्याने ‘वास्तव’ सिनेमाचा एक किस्सा सांगितला.
 
 
 
भूमिकेविषयीचा प्रसंग सांगताना तो म्हणाला, ‘वास्तवमधील भूमिका माझ्याच वाट्याची होती असं मला वाटतं. महेश मांजरेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आणि त्यांना माझं काम माहीत होतं. जेव्हा त्यांनी पटकथा निर्मात्यांना ऐकवली तेव्हाच त्यांनी माझं नाव त्यांच्या कानावर घातलं. पण निर्मात्यांनी ते नाकारलं. या भूमिकेसाठी एखादा चर्चेतला अभिनेता हवा असं निर्माते म्हणाले. दुसऱ्या अभिनेत्याची निवडसुद्धा झाली होती. पण ऐन शूटिंगच्या आदल्या दिवशी त्याने भूमिका नाकारली. तेव्हा निर्मात्यांनी मला बोलवायला सांगितलं.
 
शिवाजी पार्कात मी मित्रांसोबत गप्पा मारत असताना पेजरवर महेश मांजरेकर यांचा मेसेज आला. तसाचं मी रात्री त्यांना भेटायला गेलो. निर्माते आणि संजय दत्त पण तिथेच होता. त्यांनी माझा अभिनय पहिला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावलं. तेव्हा मी एका कोपऱ्यात चहा पित बसलो होत. संजय दत्त स्वत: माझ्याजवळ आला आणि बोलला, इसको अभी कुर्सी देनेका बैठने के लिए. त्यावेळी त्यांनी माझ्यात आत्मविश्वास पण निर्माण केला. तू भी संजय मै भी संजय, तोड डालने का, डरना नहीं.’
 
‘वास्तव’ चित्रपटानंतर लोक मला ओळखू लागले होते आणि इतकंच नव्हे तर मला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. या भूमिकेमुळे आयुष्याला कलाटणी मिळाली होती. पहिल्यांदात ग्लॅमर म्हणजे काय असतं याचा अनुभव मला तेव्हा आला. या चित्रपटाआधी मी रेल्वेने प्रवास करायचो. पण तेव्हापासून आजतागायत मला रेल्वेने प्रवास करता आला नाही, इतकी प्रसिद्धी वाढली,’ असं त्याने पुढे सांगितलं.