पराभवानंतरही पाच वर्षांत अमेठीत आणली विकासाची गंगा : स्मृती इराणी
   दिनांक :28-Apr-2019
 
 
अमेठीची जनता आमच्यावर प्रेम करते, असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सांगत असतात, मात्र जनता प्रेम करत असेल तर त्यांच्यावर प्रत्येक निवडणुकीत पैसे वाटण्याची वेळ का येते, प्रेम कधी पैशाने विकत घेता येत नाही, असा घणाघाती हल्ला केंद्रीय मंत्री आणि अमेठी मतदारसंघातील भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी चढवला.
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुध्द अमेठी मतदारसंघात स्मृती इराणी यांनी गंभीर आव्हान उभे केले आहे. संभाव्य पराभवाच्या भीतीने राहुल गांधी यांना केरळमधील वायनाड मतदारसंघात धाव घ्यावी लागली.
 
 
 
 
प्रचारात अतिशय व्यस्त असतांना गौरीगंज येथील निवासस्थानी तरुण भारतला विशेष मुलाखत देताना स्मृती इराणी म्हणाल्या की, जी माणसं प्रेम करतात, त्यांना पैसे द्यावे लागत नाही, मात्र कॉंग्रेसचे राजकारण पैसे दिल्याशिवाय होत नाही, निवडणुकीच्या प्रचारात कॉंग्रेसवाले पोत्याने पैसे आणतात आणि वाटतात, याचाच अर्थ जनता त्यांच्यावर प्रेम करत नाही, तर कॉंग्रेसवाले जनतेला विकत घेत असतात. 2014 मध्येच राहुल गांधी यांचा पराभव निश्चित होता, मात्र सत्तेचा आणि सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत त्यांनी निवडणूक जिंकली.
 
कॉंग्रेसच्या उमेदवाराचा उल्लेख लोक त्यांच्या नावाने करतात, तर मला मात्र दीदी म्हणतात, यातून अमेठीची जनता कोणावर प्रेम करते, हे दिसून येते, असे स्पष्ट करत इराणी म्हणाल्या की, पराभवानंतरही मी अमेठी मतदारसंघातील लोकांशी असलेला संपर्क तुटू दिला नाही, जिंकल्यानंतर राहुल गांधी जेवढ्यावेळा अमेठीत आले नाही, त्यांच्या कितीतरी पटीने मी अमेठीचे दौरे केले. अमेठीतील लोकांचे प्रश्न सोडवले.
 
अमेठी मतदारसंघात पराभवानंतर मी जेवढी विकास कामे केली, तेवढी राहुल गांधी यांनी खासदारकीच्या 15 वर्षाच्या कार्यकाळातही केली नाही. बायपासचा मुद्दा निकालात काढला. सलोन विधानसभा मतदारसंघात 400 कोटींचा ऊर्जा प्रकल्प आणला. गौरीगंजमध्ये खतांची रॅक आणली, पॉलिटेक्निक कॉलेज आणले, जगदीशपूरमध्ये ट्रॉमा सेंटर सुरू केले, तिलोईला 200 खाटांचे रुग्णालय सुरू केले. अमेठीत एके 203 बनवण्याचा कारखाना सुरू केला. भारतीय लष्कराला या कारखान्यातून बंदुकांचा पुरवठा यापुढे केला जाईल.
 
स्मृती इराणी यांनी आपल्या विकास कामांचा आढावा सादर केला. हारल्यानंतर जर मी एवढी विकास कामे करू शकते, तर जिंकल्यानंतर किती विकास कामे करेल, असा प्रश्न मतदारसंघातील जनतेला पडला आहे. त्यामुळे यावेळी मला निवडून देण्याचा निर्धार जनतेने केला असल्याचे स्मृती इराणी यांनी अतिशय आत्मविश्वासाने सांगितले.
मुलाखत सुरू असतानाच, अमेठी मतदारसंघातील विविध गावातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटीही स्मृती इराणी घेत होत्या. प्रचारासंबधी त्यांना सूचना करत होत्या. भर उन्हात आलेला कार्यकर्ता सरबत पिल्याशिवाय जाणार नाही, याची काळजी घेत होत्या, आपल्या हाताने त्यांना सरबत देत होत्या. विशेष म्हणजे सर्व जण स्मृती इराणी यांना दीदी म्हणून संबोधित करत होते, त्यांना नमस्कार करत होते, आणि स्मृती इराणीही मोठ्या बहिणीसारख्या सर्वांशी वागत होत्या.
 
तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबद्दल कॉंग्रेसवाल्यांचा द्वेष पाहून त्यांची कीव करावीशी वाटते. पर्रीकर यांच्यावर खोडसाळ आरोप केले जातात, एखाद्या व्यक्तीबद्दल त्यांच्या मृत्युनंतर असे बोलण्याची यांना लाज कशी वाटत नाही, कॉंग्रेसवाले सुखाने जगू देत तर देत नाही, पण मरणानंतरही आत्म्याला शांतता मिळू देत नाही, असे स्मृती इराणी संतप्तपणे म्हणाल्या.
अमेठीत आतापयर्र्त जिल्हाधिकारी कार्यालय नव्हते, शासकीय विश्रामगृह आणि पोलिस मुख्यालयही नव्हते, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच त्याचे उद्घाटन केले, याकडे लक्ष वेधत स्मृती इराणी म्हणाल्या की, जातीपातीचे आणि धर्माचे राजकारण करण्याऐवजी जनतेला विकास हवा आहे. अमेठी गावातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय आहे.
मतदारसंघातील न्यायपंचायतीपर्यंत मी प्रवास केला आहे, 3 लाख कुटुंबाशी प्रत्यक्ष संपर्क साधला आहे, लोकांचा विश्वास संपादन केला आहे, असे स्पष्ट करत स्मृती इराणी म्हणाल्या की, याउलट राहुल गांधी यांनी मतदारसंघातील जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळेच त्यांना केरळच्या वायनाड मतदारसंघात धाव घ्यावी लागली.
 
स्मृती इराणी बोलत असताना एक अपंग तरुण आपल्या वेदना घेऊन आला. त्याला लखनौला उपचार करायचे होते, पण त्याला कोणाची मदत मिळत नव्हती. तो अक्षरश: मोठ्याने रडायला लागला, त्याच्या वेदना पाहून स्मृती इराणी यांचे हदय कळवळले, त्यांनी तातडीने त्याच्या उपचाराची व्यवस्था करून दिली, त्यावेळी त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. तो एकदम कृतज्ञतेने स्मृती इराणी यांच्या पायाच पडला. प्रचाराला निघायची वेळ झाली होती, स्मृती इराणी यांनी मुलाखत संपवत आता आपण दिल्लीला भेटू असे सांगत मुलाखत संपवली.