...आणि श्रीलंका बॉम्बस्फोटातील सूत्रधाराच्या बहिणीला कोसळले रडू
   दिनांक :28-Apr-2019
कोलंबो, 
 श्रीलंकेत शनिवारी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर सायंकाळी श्रीलंकेच्या लष्करी गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार झहरान हाशीम याची बहीण मधानियाच्या घरी पोहोचले. मधानिया आणि तिचा पती नियास यांनी रुग्णालयात येऊन मृतांची ओळख पटवावी, असा गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्‍यांचा आग्रह होता.
 
 
 
अधिकार्‍यांनी आपल्याला छायाचित्रे दाखवावी, आपण ओळख पटविण्यास तयार आहोत, मात्र आपण तेथे जाऊन मृतदेह पाहू शकत नाही, असे मधानिया यांनी तामिळ भाषेत आपल्या पतीला सांगितले. तिची विनंती पतीने अधिकार्‍यांना सांगितली. मात्र, अधिकारी ठाम होते. ठार झालेले तेच असतील, तर तुम्ही त्यांना अखेरचे पाहणार आहात, कारण ते दहशतवादी आहेत, असे अधिकार्‍याने सांगितले. तेव्हा तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. बॉम्बस्फोटांचा सूत्रधार झहरान हाशीमसह मधानियाचा दुसरा भाऊ मोहम्मद झेयीन हाशीम हाही स्फोटात ठार झाल्याचा संशय असल्यामुळे तिने केवळ छायाचित्रे बघण्याचा आग्रह धरला होता.