अकोला, चंद्रपूर ४७.२ अंश सेल्सियस
   दिनांक :28-Apr-2019
नागपूर: गेल्या दोन-तीन दिवसांपासून विदर्भात उष्णतेची लहर आहे. सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. यावर्षीच्या हंगामात रविवार, 28 एप्रिलला राज्यात अकोला, चंद्रपुरात विक्रमी तापमान असल्याचा अंदाज आहे. रविवारी अकोला व चंद्रपूरमध्ये 47.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. सोमवार, 29 एप्रिलला मात्र या दोन्ही जिल्ह्यांचे तापमान घसरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वाशीम, यवतमाळात मात्र सोमवारी तापमान वाढण्याची शक्यता आहे.
 

 
 
दक्षता घ्या
विदर्भात उष्णतेची लहर असल्याने दक्षता घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. आवश्यक असल्यासच उन्हात बाहेर पडावे, उन्हात जाताना उन्हापासून बचावासाठी आवश्यक त्या उपाययोजना जसे- कानाला रूमाल, गॉगल लावूनच जावे. अन्यथा जास्तीत जास्त वेळ थंड वातावरणातच घालवावा, गरज वाटत नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे, ओआरएससह लिंबूपाणी, थंड पेये घेत राहावी, असे आवाहनही हवामान खात्याने नागरिकांना केले आहे. नागपुरातही गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. तापमान इतके असते की रात्री उशिरापर्यंत नळांना येणारे पाणी अक्षरश: गरम असते.
 
विदर्भातील जिल्ह्यांचे तापमान असे- अमरावती किमान 27.0, बुलढाणा कमाल 44.0, किमान 30.0, गडचिरोली कमाल 43.0, किमान 28.0, गोंदिया कमाल 43.6, किमान 25.8, नागपूर 44.9, किमान 27.4, वर्धा 45.7, 30.0, वाशीम किमान 26.4, यवतमाळ कमाल 45.5, किमान 30.2