इंडोनेशियात मतमोजणीच्या ताणामुळे 272 कर्मचार्‍यांचा मृत्यू
   दिनांक :29-Apr-2019
जकार्ता, 
इंडोनेशियामध्ये अलीकडेच राष्ट्राध्यक्ष, संसद, प्रांतिक विधिमंडळांचे सदस्य निवडण्यासाठी एकाच दिवशी मतदान होऊन मतमोजणीही लगेच घेण्यात आली होती. निवडणुकांतील या अतिकामाच्या ताणामुळे तेथील 272 निवडणूक कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला व 1878 जण आजारी पडले आहेत. पहिल्यांदाच सर्व निवडणुका एकत्र घेणे, त्याची मोजणी लगेच करणे, यामुळे कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडला. इंडोनेशियात मतदान इव्हीएमद्वारे नाही, तर मतपत्रिकांवर केले जाते.
 

 
 
26 कोटी लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियामध्ये एकाच दिवशी सर्व निवडणुका घेण्याची ही पहिलीच वेळ होती. 17 एप्रिल रोजी पार पडलेल्या या निवडणुकांमध्ये 19.3 कोटी मतदारांपैकी 80 टक्के लोकांनी मतदान केले. लाख मतदान केंद्रांवर प्रत्येक मतदाराने सर्व निवडणुकांसाठी पाच स्वतंत्र मतपत्रिकांद्वारे आपला हक्क बजावला. सकाळपासून सायंकाळपर्यंत आठ तासांच्या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली. या अतिकामाचा ताण आल्याने शनिवारी रात्रीपर्यंत 272 निवडणूक कर्मचारी मरण पावले.
 
इंडोनेशियातील निवडणुकीतील विरोधी पक्षाचे उमेदवार प्राबोवो सुबिआंतो यांच्या प्रचार मोहिमेचे उपप्रमुख अहमद मुझानी यांनी म्हटले आहे की, इंडोनेशियामध्ये एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याचे आव्हान सार्वत्रिक निवडणूक आयोगाला पेलवले नाही. विद्यमान राष्ट्राध्यक्ष व पुन्हा या पदासाठी निवडणूक लढवत असलेले जोको विदोदो यांच्या हस्तकांनी मतमोजणीमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप प्राबोवो यांनी केला होता. विदोदो हे जिंकले असल्याचा प्राथमिक अंदाज असून, निकाल 22 मे रोजी आहे.
 
निवडणूक प्रकि‘येतील कामांमुळे आजारी पडलेल्या कर्मचार्‍यांना उत्तम उपचार मिळावेत म्हणून उपाययोजना करण्याच्या सूचना इंडोनेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने प्रशासनाला दिल्या आहेत. मरण पावलेल्या तसेच आजारी असलेल्या निवडणूक कर्मचार्‍यांना भरपाई देण्याबाबत वित्त मंत्रालय लवकरच घोषणा करणार आहे.