कोल्हापूर जिल्ह्यात १६ नगरसेवकांचे राजीनामे

    दिनांक :29-Apr-2019
कोल्हापूर: मागील अनेक दिवसांपासून मुरगूड शहराला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करीत १६ नगरसेवकांनी आज आपले राजीनामे दिले आहेत. यात सत्तारूढ शिवसेना (मंडलिक गट) आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांचाही समावेश आहे. पाणीप्रश्नासाठी नगरसेवकांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, मुरगूड शहराला सरपिराजीराव तलावामधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. फिल्टर हाऊसमधील ब्लोरिंग मशिन दीड ते दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने शहरवासीयांना दूषित पाणी मिळत आहे. नागरिकांनी यावर अनेकदा आवाज उठवला. नगरपालिका प्रशासनासोबत प्रत्यक्ष चर्चाही झाली. मात्र, पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज सकाळी दहाच्या सुमारास त्याचा उद्रेक झाला. सत्तारुढ नगरसेवकांसह विरोधी नगरसेवक, नागरिकांनी पालिका कार्यालयासमोर मोर्चा काढला आणि १६ नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे प्रा. संजय मंडलिक यांच्या सुपूर्द केले.