देशभरात ६४ टक्के तर महाराष्ट्रात ५५ टक्के मतदान
   दिनांक :29-Apr-2019
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा शांततेत
देशभरात 64 टक्के मतदानाची नोंद
 
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रासह नऊ राज्यांमधील 71 जागांसाठी आज सोमवारी अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान घेण्यात आले. महाराष्ट्रासाठी हा शेवटचा टप्पा होता. देशभरात सरासरी 64 टक्के आणि महाराष्ट्रात सुमारे 55 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17, बिहारमधील 5, झारखंडमधील 3, मध्यप्रदेशातील 6, ओडिशातील 6, उत्तरप्रदेशातील 13, राजस्थानातील 13, बंगालमधील 8 आणि जम्मू-काश्मिरातील एका जागेचा समावेश आहे. या सर्व जागांसाठी एकूण 943 उमेदवार रिंगणात आहेत.
 

 
 
 
बंगालमधील काही मतदारसंघांमध्ये तृणमूल कॉंगे्रस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत अनेक जण जखमी झाले. या घटना वगळता, देशात इतरत्र कुठेही हिंसाचाराची नोंद झाली नसल्याचे दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
 
या टप्प्यात महाराष्ट्रात 55 टक्के, बिहारमध्ये 58 टक्के, झारखंड 64, मध्यप्रदेशात 66, ओडिशात 64, उत्तरप्रदेशात 58 टक्के, राजस्थानात 67, बंगालमध्ये 77 आणि जम्मू-काश्मिरात सुमारे 12 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
महाराष्ट्रातील टक्केवारी अशी
मुंबई दक्षिण-मध्य, 51.53, मुंबई दक्षिण, 48.23, उत्तर मुंबई, 54.72, मुंबई उत्तर पश्चिम, 50.44, उत्तर-पूर्व मुंबई, 52.30, उत्तर-मध्य मुंबई, 49.49, भिवंडी, 52 कल्याण, 41.64, ठाणे, 46.42, पालघर, 57.60, नंदुरबार, 62.44, मावळ, 52.74, धुळे, 50.97, शिर्डी, 56.19, शिरुर, 52.45, नाशिक, 53.09 आणि दिंडोरी मतदारसंघात 58.20 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक कार्यालयातर्फे देण्यात आली.
चौथ्या टप्प्यातील प्रमुख लढती
उत्तर-मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात अभिनेत्री आणि कॉंग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर या रिंगणात आहेत. ईशान्य मुंबईत भाजपाने विद्यमान खासदार किरीट सोमय्यांना डावलून मनोज कोटक यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे मनोज कोटक विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत होणार आहे. उत्तर-मध्य मुंबईत पूनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त, दक्षिण मुंबईत अरिंवद सावंत विरुद्ध मििंलद देवरा या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर उत्तर-पश्चिममध्ये शिवसेनेचे गजानन किर्तीकर विरुद्ध कॉंग्रेसचे संजय निरुपम यांच्यात सामना होणार आहे. मावळमध्ये पवार कुटुंबातील तिसरी पिढी अर्थात्‌ अजित पवार यांनी आपले पुत्र पार्थ यांना रिंगणात उतरविले असून, त्यांना शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी आव्हान दिले आहे. शिरुर मतदारसंघात शिवसेनेचे आढळराव पाटलांविरोधात अभिनेते आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले अमोल कोल्हेंनी आव्हान उभे केले आहे. तर नाशिकमध्ये पुन्हा एकदा हेमंत गोडसे आणि समीर भुजबळ यांच्यात मुकाबला होत आहे.