प्राणवायू न मिळाल्याने तिघे गतप्राण

    दिनांक :29-Apr-2019
लातूर,
विहिरीची स्वच्छता करण्यासाठी त्यात उतरलेल्या तिघांचा पुरेसा प्राणवायू (ऑक्सिजन) न मिळाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली आहे. फारुख मुलानी, सद्दाम मुलानी, बबलू मुलानी अशी मृतांची नावे आहेत. लातूर जिल्ह्यातील अलमला येथे आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. बेशुद्धावर लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

 
 
अलमला येथे फार वर्षापूर्वी एक जुनी विहीर होती. या विहिरीत गाळ साठल्याने ती पूर्णपणे गाळाने मुजली होती. प्लॉट मालकाने पुलासाठी वापरले जाणारे अंदाजे साडेतीन फूट व्यास असलेले सिमेंट पाईप उभे टाकून आड तयार केले होते. अलमला येथे तीव्र पाणीटंचाई असल्याने आडा नजीक असलेल्या वस्तीतील गावकरी त्या आडावर पाणी भरत होते. आडात कचरा व गाळ साचला होता व काही दिवसापासून पाणी कमी येत असल्याने आडाची स्वच्छता करण्यासाठी गावातील फारूक, रसूल, बबलू मुलानी, सुशांत बिराजदार व मुन्ना आंबूलगे हे आडात दोर लावून उतरले होते.
आडाचा व्यास कमी असल्याने एकाच वेळी पाच जण उतरल्याने पुरेसा प्रकाश व हवा येण्यास अडचण निर्माण झाली होती. दरम्यान पुरेसा ऑक्सिजन कमी पडल्याने ते गुदमरले व बेशुद्ध पडले. यांची माहिती आडाबाहेर असलेल्या नागरिकांना समजतात त्यांनी तातडीने औशाहुन ऑक्सिजनचे सिलेंडर मागवत या आडात ऑक्सिजन सोडला. तर याबाबत पोलिसांना यांची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने लातूरहून अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आडातील सर्वांना बाहेर काढले. मात्र यावेळी यातील तिघांचा मृत्यू झाला होता.