कर भरावा लागू नये म्हणून...
   दिनांक :29-Apr-2019
आताच्या केंद्रिय अंतरिम अर्थसंकल्पाने सर्वसामान्य करदात्यांना मोठा दिलासा दिला. पाच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं. आयकर कायद्यातल्या विविध कलमांअंतर्गत मिळणार्‍या सवलतींचा वापर करून एकूण 7.75 लाख रुपये उत्पन्न असलेले करदाते (ग्रॉस टोटल इन्कम) आपलं एकूण वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत आणू शकतात. यामुळे आर्थिक वर्ष 2019-20 साठी त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत पुढच्या आर्थिक वर्षात हे करदाते 15,080 रूपये कर वाचवू शकतात. या करबचतीसाठी नेमकं काय करायला हवं याविषयी...
 
 
 
आर्थिक वर्ष 2019-20 साठी कर भरताना सर्वात आधी तुम्ही 50 हजार रुपयांचं ‘स्टँडर्ड डिडक्शन’ मिळवू शकता. अंतरिम बजेटमध्ये ‘स्टँडर्ड डिडक्शन’मध्ये दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली.
 
आयकर कायद्यातल्या कलम ‘80 सी’ नुसार विविध पर्यायांमध्ये दीड लाख रुपये गुंतवून करसवलत मिळवता येईल िंकवा मुलांच्या शिकवणीसाठी भरलेल्या शुल्कासाठी एकूण उत्पन्नातून तेवढ्याच रकमेच्या सवलतीसाठी दावा करता येतो. 7.75 लाख रुपयांच्या उत्पन्नातून दीड लाख रुपये वजा केले की तुमचं उत्पन्न 6.25 लाख रुपयांपर्यंत खाली येईल. यानंतर कलम ‘80सीसीडी(1 बी)’ अंतर्गत ‘नॅशनल पेन्शन स्कीम’मध्ये 50 हजार रुपयांची गुंतवणूक करा. आरोग्य विम्याचा 25 हजार रुपये हप्ता भरून कलम ‘80 डी’ अंतर्गत तेवढ्या रकमेची सवलत मिळवता येईल. ज्येष्ठ नागरिक असलेल्या पालकांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यासाठी जास्तीची सवलत मिळेल. व्याज म्हणून मिळणार्‍या दहा हजार रुपयांच्या उत्पन्नासाठीही कलम ‘80 टीटीए’ अंतर्गत सवलत मिळवता येईल.