डी. राजा यांनी तोडलेले अकलेचे तारे!
   दिनांक :29-Apr-2019
 
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव डी. राजा यांनी हिंदू या दैनिकात एक लेख लिहून, आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. विशेष म्हणजे त्यांना इतक्या वर्षांनंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवणही आली आहे. डी. राजा या लेखात म्हणतात, डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अतिशय परिश्रमाने आणि सर्वांगीण विचार करून संविधान तयार केले. पण, आज त्या संविधानाला लोक विसरून गेले आहेत. नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. पण, आंबेडकरांचा वारसा जपणूक करण्याची तसदी कुणीही घेतली नाही. आधी डी. राजा यांनी आपल्या कार्यालयात डॉ. आंबेडकर जयंती साजरी केली काय, हे सप्रमाण सिद्ध करावे. केवळ स्वार्थासाठी डॉ. आंबेडकरांचे नाव घेऊन दलित, मागासवर्गीय, आंबेडकरी समुदायाला भडकाविण्याचा त्यांचा डाव दिसतो.
 

 
 
 
डी. राजा यांच्या म्हणण्यानुसार, आज लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. जेव्हापासून नरेंद्र मोदी यांचे सरकार आले आहे, तेव्हापासून विरोधकांची गळचेपी सुरू आहे. अनेक वैधानिक संस्थांची त्यांनी वाट लावली आहे. विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. देशातील तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेला महत्त्व देत आहेत आणि जनतेचे लक्ष या मुद्यांकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. डाव्यांच्या नेहमीच्या आरोपाप्रमाणे डी. राजा यांनी आपला मोदीद्वेष या लेखातून उगाळला आहे. त्याबद्दल आक्षेप असूच शकत नाही. पण, डी. राजा यांनी राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा, विरोधकांची गळचेपी वगैरे मुद्यावर बोलण्याआधी आपण आपल्या हातात सत्ता असताना, कोणते दिवे लावले आणि आताही लावले जात आहेत, याकडे आधी लक्ष दिलेले बरे! डावे पक्ष रसातळाला का जात आहेत, याची आधी त्यांनी मीमांसा करण्यात आपला अमूल्य वेळ खर्ची घातलेलाच बरा! डी. राजा यांनी विरोधकांची गळचेपी सुरू असल्याचा आरोप लावला आहे. आता थोडे वास्तवाकडे वळू या.
 
1977 पासून 2009 पर्यंत पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीचे सरकार होते. या आघाडीत भाकपा हाही पक्ष होता. या कालावधीत प. बंगालमध्ये तब्बल 58,408 राजकीय हत्या झाल्या. 1977 ते 1996 या कालावधीत बंगालमध्ये 28 हजार राजकीय हत्या झाल्याची अधिकृत माहिती, तेव्हाचे कॅबिनेट मंत्री बुद्धदेव भट्‌टाचार्यजी यांनी विधानसभेत दिली होती. याची आकडेवारीही त्यांनी पटलावर ठेवली होती. या हत्यांव्यतिरिक्त बलात्काराच्या 2516, विनयभंग 3013, नवविवाहितांचा छळ 17,571 इ. घटना घडल्याचे या उत्तरात नमूद आहे. विरोधी पक्षांची हत्या करणार्‍या डाव्या आघाडीच्या सरकारने विरोधकांची कशी गळचेपी केली होती, त्याचे हे उत्तम उदाहरण. 2009 पर्यंत हाच आकडा वाढून 58 हजारांपर्यंत पोचला. गळचेपी एकदाची समजू शकतो. पण, एवढ्या मोठ्या संख्येत हत्या? डी. राजा यांनी आधी आपल्या कार्यकाळात कोणते दिवे लावले, याचे उत्तर दिले पाहिजे. महिलांवरील अत्याचाराचे आकडे तर सुन्न करणारे आहेत. हेच का तुमचे सर्वसामान्य जनतेविषयीचे प्रेम? मोदींना तर सारेच विरोधक कोसत आहेत. हा माणूस पुन्हा पंतप्रधानपदी नको, असेच सर्व जण म्हणत आहेत. पण, मोदी सर्वांना पुरून उरत असल्याने विरोधकांचा तिळपापड झाला आहे. असे का झाले, जनतेने 2014 मध्ये सार्‍याच विरोधकांना धूळ चारत स्पष्ट बहुमत का प्राप्त केले, यावर आधी डी. राजा यांनी मंथन केले पाहिजे. देशात कुणाच्याही हाती अनिर्बंध सत्ता येऊ नये यासाठी देशात एक सशक्त विरोधी पक्ष असावा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवले आहे. त्याच वेळी विरोधकांचे दायित्व काय आहे, हेही त्यांनी सांगून ठेवले होते. वागत आहेत का विरोधक त्याप्रमाणे? ते दिवटे राजकुमार मोदींच्या गळ्यात पडत आहेत, डोळा मारत आहेत. हे आहे का विरोधकांचे दायित्व? केरळमध्ये विरोधकांची सर्रास हत्या केली जात आहे. हे आहे का विरोधकांचे दायित्व?
 
पश्चिम बंगालमध्ये संविधान आणि लोकशाहीचा दूरपर्यंत कुठेही लवलेश नाही. हे विरोधकांना दिसत नाही का? आमच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक केले. त्याचे पुरावे मागताना विरोधकांना जराशीही लाज कशी काय वाटली नाही? हे आहे का विरोधकांचे दायित्व? मग अनिर्बंध सत्ता कोण राबवीत आहे? मोदींचे पत्ते तर खुले आहेत. देशातील तळागाळातील जनता असंतुष्ट असती, तर ती रस्त्यावर आली असती. बेरोजगारांची जी संख्या कॉंग्रेसचे दलाल वाढवून सांगत आहेत, त्याची दखल घेतली, तर एवढ्या मोठ्या संख्येने बेकार रस्त्यावर उतरले का नाही? सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विरोधकांनी जनतेचा विश्वास केव्हाच गमावला आहे आणि सारा देश मोदींसोबत खंबीरपणे उभा आहे. हे वास्तव आहे. राजा म्हणतात, जे मोदींविरोधात आवाज उठवितात, त्यांना अर्बन नक्सल म्हणून आणि राष्ट्रद्रोही ठरविले जात आहे. मि. राजा अर्बन नक्षल्यांचे साथीदार कोण, हे देशाला आता कळून चुकले आहे. राहुल गांधी म्हणतात, अर्बन नक्सल हे एनजीओ आहेत. स्पष्ट बोला ना. लाज कशाची वाटते?
 
प्रश्न असा आहे की, राजा आणि युवराजाला नक्षल्यांचा एवढा पुळका कशासाठी? हे तरी एकदा देशापुढे सांगावे. नक्षलवाद मुर्दाबाद एकदा तरी म्हणून दाखवावे. आहे िंहमत? ‘भारत तेरे टुकडे होंगे’ म्हणणार्‍यांसोबत तुम्ही होते ना? तुमची मुलगी अपराजिता हीसुद्धा तेच नारे देत होती. मग तुम्ही तिला जेएनयुमधून फरफटत आपल्या घरी नेले होते. खरे की नाही? खासदार म्हणून तुम्हाला बंगला आहे. मग तुमची कन्या तुमच्या घरी का राहात नाही. का तिने एका हुशार विद्यार्थ्याची खोली होस्टेलमध्ये बळकावली आहे? हे आहे विरोधकांचे दायित्व? लाज वाटायला पाहिजे. म्हणे आज देशाची लोकशाही धोक्यात आहे. कोणत्या कारणांनी? मोदींमुळे की नक्षलवादी आणि दहशतवाद्यांमुळे? याकुब मेननचे मित्र असलेले डी. राजा यांनी यामागील गुपित तरी समजावून सांगावे. नक्षल्यांना छुपी मदत कोण करीत आहेत, कोणत्या विदेशी शक्ती त्यांना रसद पोचवीत आहेत, हे आता लपून राहिलेले नाही मि. राजा. दहशतवादी आणि नक्षल्यांजवळून जप्त केलेली शस्त्रे ही चिनी बनावटीची असल्याचे आढळून आले आहे. आज आदिवासी भागात नक्षल्यांनी शेकडो आदिवासी, दलित यांना ठार मारले. काहींचा तर अतिशय निर्घृणपणे जीव घेतला. विरोधक आणि स्वत:ला सेक्युलर, मानवतावादी, एनजीओ म्हणविणारा एकही माईचा लाल या घटनांचा साधा निषेधदेखील करत नाही, हे आहे विरोधकांचे दायित्व! दलित-आदिवासींबद्दल कळवळा दाखविणार्‍या डी. राजा यांचा या लेखाचा उद्देश वेगळा आहे. डॉ. आंबेडकरांचे नाव घेऊन दलित युवकांना भडकाविणे आणि नक्षल्यांसाठी कॅडर तयार करणे, हा यामागील उद्देश आहे. शेवटी ‘‘ज्या वेळी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण होईल, त्या वेळी सर्व भारतीयांनी आपल्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढा देऊन स्वातंत्र्याचे रक्षण करावे,’’ हा आंबेडकरांचा मंत्र देशवासी विसरले नाहीत. देशाला धोका मोदींपासून नाही, तर डी. राजासारख्या नेत्यांपासून आहे, हे त्यांनी पुरते ध्यानात घेतलेले बरे. पप