कुस्तीपटू बजरंग आणि विनेश यांची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस

    दिनांक :29-Apr-2019
नवी दिल्ली,
नुकत्याच पार पडलेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या बजरंग पुनिया आणि कांस्यपदक विजेत्या विनेश फोगाट यांची भारतीय कुस्ती महासंघाने खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. गतवर्षीही बजरंगची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती, परंतु भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला हा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय अर्जुन पुरस्कारासाठी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. 
 
 


राहुलसह हरप्रीत सिंग, दिव्या काकरान आणि पूजा धांडा यांचेही नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे. विरेंद्र कुमार, सुजीत मान, नरेंद्र कुमार आणि विक्रम कुमार यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
 
 
 
ध्यानचंद पुरस्कारासाठी भीम सिंग आणि जय प्रकाश यांचे नाव पाठवण्यात आले आहे. बजरंगने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 2013 मध्ये 60 किलो वजनी गटात कांस्यपदक, तर 2018 मध्ये 65 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. आशियाई स्पर्धेत त्याने 2018 मध्ये सुवर्ण, तर 2014 मध्ये रौप्यपदक जिंकले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याच्या नावावर सुवर्ण ( 2018) आणि रौप्य ( 2014) पदक आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने दोन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं पटकावली आहेत.