पालघरमध्ये एका महिलेचे ६८ वेळा मतदारयादीत नाव

    दिनांक :29-Apr-2019
हजारो बोगस नावे असल्याचा शिवसेना, बविआचा आरोप
 
 
पालघर: पालघर मतदारसंघात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीमध्ये मुख्य लढत होत आहे. दरम्यान, मतदानाच्या आधी शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीने मतदारयादीमध्ये हजारो नाव बोगस असल्याचा आरोप आज सोमवारी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे केला.
 

 
 
बविआने 60 हजार मतदारांची तर, शिवसेनेने 56 हजार मतदारांची नावे दोनदा मतदारयादीत असल्याचा आरोप केला. सुरेखा सुरेश पाटील या महिलेचे नाव तब्बल 68 वेळा मतदारयादीत आले असून, ही बाब शिवसेनेने निवडणूक यंत्रणेच्या निदर्शनास पुराव्यासह आणून दिली. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणीही शिवसेनेने केली आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघातील बोईसर, नालासोपारा, वसई, पालघर नगर परिषद हद्दीतील हजारो बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली असल्याची तक्रार बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत नारनवरे यांच्याकडे केली. यावेळी संबंधित मतदानकेंद्रावर अतिरिक्त अधिकार्‍यांची नेमणूक करून तसेच, वेब कास्टिंगद्वारे या मतदानकेंद्रावर लक्ष ठेवण्याचे आश्वासन निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्यांना दिले.
पालघर लोकसभा मतदारसंघात बविआचे बळीराम जाधव आणि भाजपा महायुतीचे राजेंद्र गावित यांच्यात प्रमुख लढत आहे.