मुंबईत बिग बाजाराला भीषण आग

    दिनांक :29-Apr-2019
 
 
मुंबई: माटुंगा परिसरातील बिग बाजारला भीषण आग लागल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांवरील बचावपथकाने अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली असून, ही आग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सूत्रानुसार, माटुंगा पश्चिम येथील तुळशी पाईप मार्गावर असलेल्या बिग बाजारमध्ये आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आग लागली. त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी 10 गाड्यांवरील बचावदलाने आगीवर नियंत्रण मिळवले. मुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीच्या मतदानानिमित्त सुटी असल्यामुळे बाजारमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होती. मात्र, आग लागल्याचे लक्षात येताच ग्राहक आणि कर्मचार्‍यांनी बाहेर धाव घेतली. काही कर्मचारी आतील वस्तू वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच आगीचा पुन्हा भडका उडाला. मात्र, त्या सर्वांना बाहेर काढण्यात आले असून, अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.