उन्हामुळे पेट्रोल भरलेल्या वॅगनला भीषण आग
   दिनांक :29-Apr-2019
टीमटाला स्थानकावरची घटना
मोठी दुर्घटना टळली
वाढलेल्या तापमानाचा परिणाम
 
अमरावती: पाणेवाडीवरून लाखोडी येथे पेट्रोल घेऊन जाणाऱ्या ५२ वॅगनच्या (डब्बे) रेल्वे गाडीच्या २३ क्रमांकाच्या वॅगनला तीव्र उन्हाने वाढलेल्या तापमानामुळे आज दुपारी १२ वाजता बडनेरा पासून काही अंतरावर असलेल्या टीमटाला रेल्वे स्थानकाजवळ भीषण आग लागली. ही घटना लगेच लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
 

 
 
पेट्रोल घेऊन जाणारी रेल्वे गाडी भरधाव वेगात असताना गाडीचे गार्ड एस. एम. मगर यांना २३ क्रमांकाच्या वॅगनला आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच गाडी चालक व सोबतच नजीकचे रेल्वे स्थानक असलेल्या टीमटाला स्थानकावरच्या व्यवस्थापक सुनीता बोडखे यांना दिली. बोडखे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सूत्रे हलविली. वरिष्ठ अभिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांनी अमरावती व चांदुर रेल्वे येथील अग्निशमन दलाला माहिती दिली. तो पर्यंत सदर मार्गावरची रेल्वे वाहतूक तातडीने थांबविण्यात आली. मार्गावरच्या ज्या गाड्या जिथे होत्या तेथेच थांबल्या. दुसरीकडे पेट्रोल घेऊन येणारी रेल्वे टीमटाला स्थानकावर पोहचली. गाडी थांबताच ज्या २३ क्रमांकाच्या वॅगनला आग लागली होती. त्या वॅगनच्या पुढच्या व मागच्या वॅगन बाजूला करण्यात आल्या. हे कार्य सुरू असताना वॅगनच्या वरच्या बाजूला असलेल्या झाकणातून आगीचे लोट बाहेर पडत होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाने क्षणाचाही विलंब न लावता पेट घेतलेल्या वॅगनवर आग विझविण्यासाठी उपयुक्त असलेल्या द्रवरूपी पांढऱ्या शुभ्र फोमचा मारा प्रेशर पाईपने सुरू केला. जवळपास १० ते १२ डबक्या फोम सलग वॅगनवर टाकण्यात आले. त्यानंतर आग शांत झाली. या वॅगनचे परीक्षण अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी केले. धोका टळल्याची शाश्वती पटल्यावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. व्यवस्थापक बोडखे व गार्ड एस. मगर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर सर्वप्रथम या मार्गावरची थांबविलेली वाहतूक सुरू करण्यात आली. तसेच ज्या वॅगनला आग लागली होती, ती वॅगन बाजूला करून पुढच्या-मागच्या वॅगन एकमेकांना जोडून ५१ वॅगनची पेट्रोल रेल्वे गाडी पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली. टीमटाला रेल्वे स्थानकावर ठेवलेल्या वॅगनचे रेल्वेचे अधिकारी पुन्हा निरीक्षण करणार आहे. ही आग गेल्या तीन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे लागल्याचे सांगण्यात आले. सदर घटना वेळीच गार्डच्या लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली.