जर्मन बेकरी बॉम्बस्फोट; यासीन भटकळवर आरोप निश्चित
   दिनांक :29-Apr-2019
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी यासीन भटकळविरोधात सोमवारी न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले. या प्रकरणी पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे. दिल्ली पोलिसांनी या खटल्याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्यायालयात केली आहे.
 
 
कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी येथे १३ फेब्रुवारी २०१० रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये १७ जणांचा मृत्यू आणि ५७ जण जखमी झाले होते. जर्मन बेकरीत मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये यासीन दिसून आला होता. यासीन भटकळ याला ऑगस्ट २०१३ मध्ये नेपाळच्या सीमेवर अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पुण्यातील न्यायालयात खटला सुरु आहे.
गेल्या दीड वर्षांपासून यासीन भटकळला सुनावणीसाठी न्यायालयात न आणल्याने न्यायालयाने तपास यंत्रणांना फटकारले होते. अखेर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी यासीन भटकळला न्यायालयासमोर हजर केले. न्या. वडणे यांनी यासीन भटकळला सुनावणीदरम्यान विचारले की, तुझ्यावरील आरोपांबाबत तुझे म्हणणे काय. यावर भटकळने सांगितले की माझ्यावरील आरोप निराधार असून मी निर्दोष असल्याचे त्याने सांगितले.