राज ठाकरे पावणे दोन तास मतदानाच्या रांगेत
   दिनांक :29-Apr-2019
मुंबई,
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान महाराष्ट्रात संथगतीनं सुरू असलं तरी काही मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहेत. मुंबई, ठाण्यात लोकांना तासन् तास रांगेत उभं राहावं लागत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आज तब्बल पावणे दोन तास रांगेत उभं राहावं लागलं.
 
 
राज ठाकरे हे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात राहतात. त्यांनी दादरमधील बालमोहन विद्या मंदिर शाळेत मतदान केलं. मतदानासाठी सकाळी पावणे बाराच्या सुमारास ते मतदान केंद्रावर पोहोचले. राज यांच्या आई कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला, मुलगा अमित व मुलगी उर्वशी हेही त्यांच्यासोबत होते. मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर त्यांनी मतदानासाठी रांग लावली. राज यांच्या आई ज्येष्ठ नागरिक असल्यानं त्यांना लगेच मतदान करता आलं. मात्र, राज यांना पावणे दोन तास रांगेत उभं राहावं लागलं. मतदान केंद्रावर असलेली गर्दी, व्हीव्हीपॅट पावतीसाठी होणाऱ्या विलंबाचं कारण यासाठी देण्यात येत होतं. अखेर पावणे दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर दीडच्या सुमारास त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.