पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात...

    दिनांक :29-Apr-2019
मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये पेडर रोड परिसरात आज सोमवारी मतदान केले. मतदान केल्यानंतर त्यांनी शनिवारी पंतप्रधानपदाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी भाष्य केले. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे यावेळी शरद पवार म्हणाले.
 

 
 
यावेळी बोलताना पवार म्हणाले, मला विचारले होते की, राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी इतर कोण पर्याय आहेत, तर, त्यावर मी मायावती, ममता, चंद्राबाबू नायडू अशी नावे सांगितली होती. हे ज्यांनी चुकीचे छापले, त्यांचा हा बालिशपणा आहे.
शरद पवार यांनी पुन्हा पंतप्रधानपदाविषयीचा अंदाज वर्तवल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. रालोआला बहुमत मिळाले नाही तर, ममता बॅनर्जी, मायावती आणि चंद्राबाबू नायडू हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शनिवारी केले होते.
आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचेही पवारांनी या मुलाखतीत म्हटले होते. राष्ट्रवादी फक्त 22 जागांवर लढत असून, या सर्व जागा जरी आम्ही जिंकल्या, तरी, बहुमताचा आकडा फार मोठा आहे. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी माझ्या नावाचा प्रश्नच येत नाही. रालोआला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी आणि मायावती हे मला पंतप्रधानपदासाठी योग्य पर्याय दिसतात, कारण त्यांच्या पाठीशी मुख्यमंत्रिपदाचा अनुभव आहे, असेही पवार म्हणाले होते.
दरम्यान, आज माध्यमांशी मतदानानंतर बोलताना पवार म्हणाले, मला सगळ्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मावळ काय, बारामती काय, मुंबई काय, सगळ्याच निवडणुका महत्त्वाच्या आहेत. यावेळी लोक निर्णायक निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.