श्रीलंकेत चेहरा झाकण्यावर बंदी
   दिनांक :29-Apr-2019
ईस्टर सणावेळी चर्च व आलिशान हॉटेलांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. २१ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३५९ जणांनी प्राण गमावले तर ५०० च्या वर नागरिक जखमी झाले होते. याची खबरदारी म्हणून आज सोमवारपासून श्रीलंका सरकारने संपूर्ण चेहरा कपड्याने झाकण्यावर बंदी घातली आहे.

 
श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी हा निर्णय घेतला आहे. मुस्लीम महिलांचा बुरखा किंवा नकाब याचा उल्लेख न करता केवळ ओळख पटावी म्हणून लोकांनी चेहरे झाकू नयेत असं सिरिसेना यांनी म्हटलं आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.
 
 
‘कोणत्याही प्रकारे चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ओळख पटण्यावर अडचण होईल असा कोणत्याही प्रकारे चेहरा झाकू शकत नाही. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.’ असे श्रीलंका सरकारनं स्पष्ट केले आहे. साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी ISISने घेतली होती. त्यानंतर सरकारने या नव्या कठोर बदलांची मागणी केली होती. अखेर त्यावर निर्णय घेत बुरखा आणि चेहऱ्यावर कपडा बांधण्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहे.