वर्धेत चोरीच्या भीतीने पाण्याचा ड्रम कुलूप बंद
   दिनांक :29-Apr-2019
जिल्ह्यात ११ टक्के पाणी शिल्लक 
वर्धा: एप्रिल संपतो आहे. तळपणाऱ्या सूर्याचा अख्खा मे महिना बाकी आहे. जूनमध्येही पाऊस कधी येईल हे नक्की सांगता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यावर जलसंकटाचे ढग अजून गाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याची बचत करण्याचे कितीही आवाहन केले तरी पाण्याशिवाय सर्वच गोष्टी अडून जातात. पहिला पाऊस पडत नाही तो पर्यंत पाणी पुरावे यासाठी वर्धा नपने नियोजन केले. त्यामुळे आठवड्यातुन एकदा पाणी मिळत आहे. शहरात पाण्याची चोरी होऊ नये यासाठी वडार वस्तीत चक्क तीन चार घरी पाणी भरून ठेवलेल्या पाण्याच्या टाकी कुलूप बंद करून ठेवल्या आहेत. जिल्ह्यात आज २९ रोजी फक्त ११ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
 
 
 
 
जिल्ह्यात जलसंकट दिवसेनदिवस वाढते आहे. परिस्थिती उपाय योजना करण्याच्या पलीकडे गेली आहे. जो काही पाणीसाठा शिल्लक आहे त्यावरच दिवस काढावे लागणार आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली असून शहरात अजूनही बोअर करून पाणी काढण्यासाठी जोरकस प्रयत्न सुरू असून प्रशासनाने बोअर करण्यावर निरबंध न टाकल्याने ३००, ३५० ते ४०० फुटावरून पाणी काढायचे प्रयत्न सुरू आहेत. घरोघरी बोअर करण्याचा धडाका सुरू आहे. जिल्ह्यात मोठे ११ प्रकल्प आहेत. त्यात केवळ ११ टक्के पाणी शिल्लक असून लघु प्रकल्प निरकच्या वाटेवर आहेत. वर्धा शहरासह परिसरातील ११ गावाना पाणी पुरवठा करणारा धाम प्रकल्पही ऑक्सिजनवर आला आहे. धाम प्रकल्पात १० टक्के, बोर प्रकल्पात १४ टक्के, निम्मंवर्धा प्रकल्पात ६.५ ,टक्के एवढाच पाणीसाठा आहे. वर्धा नप आणि जीवन प्राधिकरणकडून ११ गावांना धाम येथून पाणी पुरवठा केला जातो. त्याच धरणात १० टक्के पाणी असून जूनपर्यंत हे १० टक्के पाणी पुरेल याचे नियोजन करावे लागेल अशी माहिती, सिंचन विभागाचे अभियंता काळे यांनी दिली.
 
नपने नियोजन म्हणून आठ दिवस आड पाणी पुरवठा करणे सुरू केले. अनेकांकडे पाणी साठवून ठेवण्यासाठी आवश्यक ते साहित्य नसल्याने प्लस्टिक ड्रम खरेदी करून त्यात पाण्याचे साठवण करून ठेवल्या जात आहे. आर्वी नाक्यावर असलेल्या वडार वस्तीत ट्रँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नगर पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या वडार वस्तीतील नागरिकानी ही पाणी साठवून ठेवण्यासाठी ड्रम खरेदी केले. आठ दिवसातून येणारे पाणी जपून वापरणे सुरू असतानाच रात्रीतून पाणी चोरी जात असल्याने रस्त्याच्या कडेला झोपडी वजा घरात राहणाऱ्यांनी चक्क पाणी भरून ठेवलेल्या ड्रमला कुलूप लावून ठेवले.
 
या संदर्भात त्या वस्तीतील दिगमबर जाधव यांच्यासोबत चर्चा केली असता ते म्हणाले की रात्र रात्र जागून पाण्याची वाट पहावी लागते, हाप्सीवर पाण्यासाठी भांडण होतात. घरातील सर्वांनाच हाप्सीवर रंगीत उभे रहावे लागते. रात्री पाणी भरून झोपल्या नंतर आजूबाजूचे काही लोक ड्रम मधून पाणी चोरून नेत असल्याचे दुसऱ्यादिवशी सकाळी उठल्यावर दिसत होते. मग, उन्हा डोकं खराब होऊन पाण्यासाठी भांडण केल्यापेक्षा आम्ही ३-४ घरानी पाण्याच्या ड्रमला जुलूप लावणे सुरू केले त्यामुळे आत्ता पाणी चोरी होणे बंद झाल्याचे जाधव यांनी सांगितले. पाण्यासाठी साधे भांडनच नाही तर डोकं फोडाफोडी पर्यंतवर गेले असून पोलिसात तक्रारी होऊ लागल्या आहेत.