पूर्व विदर्भातील प्रकल्पांनी गाठला तळ
   दिनांक :29-Apr-2019
धरणांमध्ये केवळ ११ टक्के जलसाठा
 
नागपूर: एप्रिल महिन्यात उन्हाचा जोर प्रचंड वाढला आहे. राज्यातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४० ते ४५ अंशांवर पोचले आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनही झपाट्याने होत असल्याने धरणांनी तळ गाठला आहे. पूर्व विदर्भातील मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३०९ दलघमी पाणीसाठा उरला आहे. गडचिरोलीतील एका मोठ्या धरणात तर टिपूसही उरलेले नाही! पूर्व विदर्भातील एकूण ३७२ धरणांमध्ये केवळ ११ टक्केच जलसाठा शेष आहे.
 

 
 
पूर्व विदर्भात मोठे १८, मध्यम ४० आणि ३१४ लघुप्रकल्प आहेत. गेल्यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने अनेक धरणे भरलीच नाही. १८ मोठ्या धरणांमध्ये मृत पाणीसाठा आहे. या प्रकल्पांची क्षमता ३५५४ दलघमी असून, आज त्यांच्या पात्रांमध्ये केवळ ३०९ दलघमी इतकेच पाणी उरले आहे. ४० मध्यम प्रकल्पांमध्ये ५५ दलघमी असा मृत पाणीसाठा असून, या प्रकल्पांची क्षमता ५३८ दलघमी इतकी आहे. ३१४ लघुप्रकल्पांमध्ये १८६ असा मृत पाणीसाठा असून, या प्रकल्पांची क्षमता ५०३ दलघमी इतकी आहे. या धरणांमधून सिंचनासह पिण्यासाठी पाणी सोडण्यात येत असल्यामुळे पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. दोन धरणांमध्ये पाणीच उरलेले नाही. आताच ही परिस्थिती असताना मे महिन्यात काय होईल, या भीतीने प्रत्येकाचीच झोप उडाली आहे. मे महिन्यानंतर जून महिन्यातही प्रचंड उन्ह तापते. शिवाय जुलै महिन्यातही पाणी पुरविताना जलसंपदा विभागाला कसरत करावी लागते. राज्यात १५ जुलैनंतरच ख‍èया अर्थाने पावसाळा सुरू होतो, ही बाब लक्षात घेऊनच पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. जुलै महिन्यात पाऊस सुरू न झाल्यास एकेका थेंबासाठी संघर्ष करावा लागेल.
टेमघर धरण कोरडे ठाक पडले आहे. नागपुरातील ५ मोठ्या प्रकल्पांमध्ये १०० दलघमी पाणी आहे. तर १३ मध्यम प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. या धरणांमध्ये केवळ २७ दलघमी पाणी आहे. ६० लघुप्रकल्पांमध्ये २२ दलघमी पाणीसाठा शेष आहे. नागपुरातील एकूण ७८ प्रकल्पांमध्ये केवळ १४९ दलघमी इतकेच पाणी उरल्याने मे महिन्यात नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.